बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना घरात प्रवेश नाकारला; ग्रामस्थांनी घेतली खबरदारी

 देसाईगंज : येथील रेल्वे स्थानकावर परराज्यातून आलेले मजूर.
देसाईगंज : येथील रेल्वे स्थानकावर परराज्यातून आलेले मजूर.

गडचिरोली : शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच प्रशासनाने विलगीकरण केलेल्यांच्या संख्येतही दुप्पट वाढ झाली आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या मदतीने त्यांना सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. मात्र, आता बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांना थेट घरी प्रवेश नाकारला जात असून खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थ कडक अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित घराजवळ पोहोचण्यासाठी जिल्हा सीमेवरून प्रत्येक मजुराला मोफत बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मजुरांना दिलासा मिळाला असून त्यांची पायपीट थांबली आहे. जिल्ह्यातील 16 हजार 800 मजूर जिल्ह्याबाहेर ठिकठिकाणी कामासाठी गेले होते. त्यापैकी आतापर्यंत राज्याबाहेरील 6,713 व 799 इतर जिल्ह्यांमधून मजूर आपापल्या गावात परतले आहेत.

मोफत बसेसची व्यवस्था

गडचिरोली जिल्ह्यातील मजूर मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेश, तेलंगणा व इतर राज्यांत अडकले आहेत. या मजुरांना स्थानिक प्रशासनाकडून महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आणून सोडण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक मजूर पायी स्वगावी जाण्यासाठी निघत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता मोफत बसेसची व्यवस्था केली.

रेल्वेगाडी वडसा रेल्वेस्थानकावर पोहोचली

बुधवारी (ता. 6) अनेक मार्गांवर मजुरांना आणण्यासाठी लालपऱ्या धावताना दिसून आल्या. आंध्र प्रदेशमधून बुधवारी सकाळी नऊ वाजता एक हजार मजुरांना घेऊन निघालेली रेल्वेगाडी वडसा येथील रेल्वेस्थानकावर पोहोचली. त्यातील जिल्ह्यातील 7 तालुक्‍यांमध्ये विविध ठिकाणी मजुरांना मोफत बसद्वारे पोहोचविण्यात आले. प्रशासनाकडून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या तसेच शारीरिक अंतर राखण्याचा अटीवर जिल्ह्यातील अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी तीन-चार दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.

बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांची वैद्यकीय तपासणी

गडचिरोली शहर तसेच तालुका मुख्यालयातील बाजारपेठांमधील दुकाने सुरू करण्याबाबत लवकरच लेखी निर्देश काढले जाणार आहेत. बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांची वैद्यकीय तपासणी प्रशासनाकडून केली जात आहे. तसेच त्यांना घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत. सर्व प्रवाशांना क्वारंटाइन कालावधीमध्ये 14 दिवस घरातच राहणे अनिवार्य केले जाणार आहे.

तेंदूपत्ता संकलनाबाबत सूचना

जिल्ह्यातील तेंदूपत्ता संकलन सुरू होत आहे. मजुरांसह विविध कंत्राटदारांना यासाठी प्रवास व मजुरांची ने-आण करणे आवश्‍यक आहे. याबाबत काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने याबाबत आवश्‍यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी (ता. 5) आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील मुख्य आर्थिक स्रोत हा तेंदूपत्ता असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या व्यवसायातून होत असते. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन सुव्यवस्थित होईल, याकडे प्रशासनाने लक्ष घालून मजुरांच्या हाताला काम द्यावे, अशा सूचनाही वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com