'बर्ड फ्लू'ची धास्ती; चिकनसोबत अंडी बंद, तर खवय्यांच्या शाकाहारावर उड्या!

राजेश रामपूरकर
Saturday, 16 January 2021

बर्ड फ्लूच्या भीतीने आठवड्यापासून ग्राहक संख्येमध्ये ५० टक्के घट झालेली आहे. पूर्वी १५० ते १७० रुपये किलो दराने विकले जाणारे चिकन आता ६० ते ७० रुपये किलोने विकले जात आहे.

नागपूर : राज्यात बर्ड फ्लूचा प्रभाव सध्या दिसत नसला तरी काही जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या घटनांमुळे उपराजधानीत मांसाहारापेक्षा पुन्हा एकदा शाकाहाराला पसंती देऊ लागल्याचे दिसत आहे. अंडी पूर्ण उकडून खा, मांस चांगले शिजवून खा, या सूचनांनंतरही नागरिक शाकाहारी थाळीकडे वळू लागले आहेत. मात्र, ज्यांना राहावले जात नाही ते चिकनऐवजी मटणाकडे वळले आहेत. 

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : ...अन् अंकिताच्या आईला रडू कोसळले; भावूक झाल्याने १५ मिनिटे कामकाज थांबले

बर्ड फ्लूच्या भीतीने आठवड्यापासून ग्राहक संख्येमध्ये ५० टक्के घट झालेली आहे. पूर्वी १५० ते १७० रुपये किलो दराने विकले जाणारे चिकन आता ६० ते ७० रुपये किलोने विकले जात आहे. मात्र, ग्राहक नाही, असे दुहेरी संकट आहे. हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी त्याचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. आपल्याकडील पारंपरिक शिजवण्याच्या पद्धतीमुळे बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे आवाहन करीत आहे. मात्र, खवय्यांमध्ये भीती वाढल्याने त्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसू लागला आहे. 

हेही वाचा - तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी 

अंड्यांचा दर नगामागे दोन ते तीन रुपयांनी कमी झाला आहे. नित्यनेमाने अंडी घेणारे ग्राहकही पाठ फिरवत आहेत. त्याऐवजी थंडीच्या काळात येणाऱ्या भाज्या, फळांवर भर दिला जात आहे. असे सगूना एग्जचे संचालक सोहेल बशीर खान यांनी सांगितले. प्रारंभी राज्यात बर्ड फ्लूचा परिणाम नसल्याने चिकन आणि अंड्याच्या मागणीत खूप घट झाली नव्हती. मात्र, आता काही जिल्ह्यांमध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. 

गृहिणी शुभा नाफडे म्हणाल्या, आम्ही नियमित चिकन खात असू, आता आमच्या गावाच्या शेजारपर्यंत म्हणजे कोंढाळीला पक्षी मृत पावलेले आढळलेले आहेत. त्यामुळे आम्ही चिकन आणि अंडी खाणे पूर्णपणे बंद केलेले आहेत. स्वतःची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आपल्याकडील शिजवण्याची पद्धती चांगली असली तरी भीतीपोटी चिकन व अंडी घरी शिजवण्याला सध्यातरी विराम दिलेला आहे. 

हेही वाचा - महिलांनो! यंदा वाणाचे ट्रेंड बदलले, हळदी-कुंकू लावताना स्पर्श टाळण्यासाठी हटके ट्रिक्स

हॉटेलमध्ये मासे, मटणाला पसंती - 
हॉटेलमध्ये मासांहारी ग्राहकांसाठी मटण, मासे असे अनेक पर्याय असतात. सध्या बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढू लागले असताना चिकन खाणाऱ्यांची संख्या कमी झालेली असताना मटण आणि मासे खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आमच्या हॉटेलमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जात आहे. असे असले तरी ग्राहकांच्या मनातील भीती पोटी चिकनची मागणी २५ ते ३० टक्के कमी झालेली आहे, असे हॉटेल प्राईडचे व्यवस्थापकीय संचालक सुजीत सिंग यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people prefer vegetarian food due to bird flu in nagpur