याला म्हणतात पेट्रोलचे महत्त्व; टॅंकर उलटताच नागरिकांनी घेतली धाव

साकोली : रस्त्यालगत उलटलेला टॅंकर. सोबत नव्या टॅंकरमध्ये इंधन भरताना कर्मचारी.
साकोली : रस्त्यालगत उलटलेला टॅंकर. सोबत नव्या टॅंकरमध्ये इंधन भरताना कर्मचारी.

साकोली (जि. भंडारा) : नागपूरवरून गोंदियाच्या दिशेने 20 हजार लिटर पेट्रोल व डिझेल हे द्रवरूप इंधन घेऊन जाणारा टॅंकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. यातील बरेच पेट्रोल व डिझेल सांडूनही सुदैवाने वाहनाने पेट न घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, रस्त्यालगत टॅंकर उलटल्याने या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प पडली होती. अनेकांनी टॅंकरमधून बाहेर पडणारे इंधन चोरून नेण्यासाठी गर्दी केली होती. ही घटना रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास महामार्गावर मोहघाटा जंगलात सराटी फाट्यावर घडली.

पेट्रोल-डिझेलचा टॅंकर उलटल्याचे माहिती होताच परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत एकच गर्दी केली होती. या टॅंकरमध्ये दोन कप्प्यात दहा हजार लिटर पेट्रोल व दहा हजार लिटर डिझेल होते. उलटलेल्या टॅंकरमधून गळती होणारे इंधन नेण्यासाठी अनेकांनी हात साफ करीत पेट्रोल-डिझेल जमा करून पळवून नेले. लोकांच्या भररस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. ज्वलनशील पदार्थ असल्याने कोणत्याही क्षणी थोड्याशाही चुकीने आग लागून मोठा स्फोट होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती.

पोलिसांनी केली वाहतूक सुरळित

घटनेची माहिती प्राप्त होताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांनासुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अप्रिय घटना घडू नये याची दक्षता घेत पोलिसांनी येताच लोकांना हटवून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर त्यांनी इंधन घेऊन जाण्याकरिता दुसरा टॅंकर पाठविला. पडलेल्या टॅंकरमधून पंपांच्या साहाय्याने इंधन ओढून नव्या टॅंकरमध्ये भरण्याचे काम दिवसभर सुरू होते.

सुदैवाने मोठी घटना टळली

हा टॅंकर रस्त्यावर उभा असल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. आज दिवसभर या मार्गाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात वाहनांची ये-जा सुरू होते. अपघातग्रस्त वाहनात चालक व वाहक दोघेच होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अरुंद मार्गावर अपघाताचा धोका

साकोली व भंडाराकडे जाणाऱ्या चार किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. हा मार्ग अत्यंत अरुंद आहे. या मार्गावर नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. इंधन घेऊन जाणारे हे वाहन ऐन जंगलात उलटले. यात ज्वलनशील इंधन असल्याने प्रसंगी आग लागून मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. अपघातग्रस्त टॅंकरमधून नवीन टॅंकरमध्ये इंधन भरण्याचे काम सुरू असल्याने आज दिवसभर इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com