कबुतर जा जा जा... पथ्रोटच्या आकाशात विहरतो कबुतरांचा थवा

pigeon
pigeon

पथ्रोट (जि. अमरावती) : रोजचे ठरावीक चाकोरीतले जिणे जगताना कंटाळलेला मनुष्य काहीतरी वेगळे छंद जोपासत असतो आणि त्यातून जीवनात आनंद निर्माण करीत असतो. लॉकडाउनमध्ये सर्व देशच घरात बंदिस्त असताना नागरिकांना त्यांच्या या छंदांनीच तारले. बाहेर फिरण्याचे सर्वच मार्ग बंद असल्यामुळे घरात राहण्यावाचून पर्याय नव्हता. या काळात कोणी गाणे गायले, कोणी कविता केल्या कोणी चित्रं काढली आणि हा वेळ सत्कारणी लावला.
अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट या संपूर्ण गावालाच कबुतरांचे वेड आहे. लॉकडाऊनमध्ये माणसे घरात बंदिस्त असली तरी पक्ष्यांसाठी कुठली बंधने नव्हती. त्यांना कोणत्याही सीमा बांधून ठेऊ शकत नव्हत्या. त्यामुळे पथ्रोटवासींनी या काळात कबुतर प्रेम भरभरून व्यक्‍त केले. आणि हवेत उंच उंच उडणाऱ्या कबुतराच्या माध्यमातून आनंद घेतला.
कोविड 19 च्या महामारीमुळे जग ठप्प झाले होते. रस्ते निर्मनुष्य झाले होते. दिवसासुद्धा एकट्या माणसाला भीती वाटावी एवढी शांतता रस्त्यावर होती. मात्र कबुतरे आकाशात उंच झेपावत होती. पथ्रोट येथे कबुतरप्रेमी अनेक आहेत. इथे पाचशे कबुतरे आहेत. कबुतरांची देखभाल करणे आणि आकाशात त्यांना उडविणे, यातूनच हे कबूतरप्रेमी आनंद लुटतात. कबुतरांचा थवा त्यांच्या घरावरून उडाला की तो आकाशातून अदृश्‍य होईपर्यंत ही मंडळी त्यांच्याकडे डोळे लावून असतात. एकदा का अदृश्‍य झाला की कबुतरे नेमके कोठे गेली असतील, याबाबत तर्कवितर्क लावतात व ते परत येण्याची प्रतीक्षा करीत असतात. एक-दोन तासांनी आकाशात पुन्हा कबुतरांचा थवा दिसला की आपली कबुतरे परत आल्याचा त्यांना प्रचंड आनंद होतो. आकाशातून खाली उतरलेल्या कबुतरांना ही मंडळी गोंजारतात. हातावर, खांद्यावर घेतात आणि त्यानंतर खुराड्यात ठेवतात. लॉकडाउनच्या काळात कबुतरांचा आकाशात मुक्‍तसंचार करण्याचा हा खेळ रोज सुरू होता. त्यामुळे लॉकडाउनमध्ये कबूतर प्रेमी आनंदात होते.
कबुतरांचा बाजार बंद
अचलपूर तालुक्‍याच्या ठिकाणी दर रविवारी व मंगळवारी कबुतरांचा खरेदी-विक्री बाजार भरतो. या बाजारामध्ये पकडून आणलेली, चोरून आणलेली किंवा स्वत:च्या मालकीची कबुतरे विक्रीला आणली जातात. मात्र लॉकडाउनमुळे बाजार बंद असल्याने कबुतरांच्या किंमतीही वाढल्या आहेत. बाजार जरी बंद असला तरी अशाही परिस्थितीत छंद जोपासणारे कबुतर विकणाऱ्यांसोबत थेट संपर्क साधून जागेवर कबुतरांची खरेदी-विक्री करीत आहेत. एका कबुतराची किमत 200 ते 350 रुपये एवढी आहे.

कबुतरांना वेगवेगळी नावे
पथ्रोटमध्ये गावरान कबुतरांच्या दोन जाती पाहावयास मिळतात. त्यापैकी एक सरळ तर दुसरी गोलाकार उडणारी आहे. हा छंद जोपासताना या तरुणांनी त्यांची आकर्षक नावेसुद्धा ठेवली आहेत. पांढऱ्या कबुतराला मोगरा, तर काळ्याला कोयला, गाजर, निळा, लाल या नावाने त्यांना हाक मारली जाते, अशी माहिती कबुतरप्रेमी गौरव डामरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com