"त्या' पोलिसाचे होते अनेक जुगाऱ्यांशी संबंध; घरात सापडले मटक्‍याचे साहित्य 

गजेंद्र मंडलिक
सोमवार, 13 जुलै 2020

चौधरीच्या घरी पोलिस पोहोचले. तेथूनही जुगाराचे साहित्य व आठ हजारांची रोकड जप्त केली. त्यानंतर काशीराम गौरच्याही घरातून 15 हजार 700 रुपयांची रोख रक्कम व जुगाराची सामग्री जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती)  : अंजनगावसुर्जी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाच्या घरातच मटक्‍याचे साहित्य सापडल्याने रविवारी (ता. 12) चांगलीच खळबळ उडाली. त्यामुळे संबंधित पोलिसाला खात्यातून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. 

अंजनगावसुर्जीत मोठ्या प्रमाणात मटका, जुगार सुरू असल्यामुळे सहायक पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या पथकाने शनिवारी (ता. 11) पोलिस नाईक विजय घुले यांच्या निवासस्थानी छापा टाकून घराची झडती घेतली. त्यात घरामध्ये मटक्‍याचे साहित्य आढळले. त्यानंतर मुंडे यांनी घुले यांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स्‌ तपासले. त्यात काही रेकॉर्ड केलेले संभाषणसुद्धा सापडले. बरेच मॅसेजसुद्धा होते. त्यानंतर पोलिसांनी मोरे याच्या घराची झडती घेतली. तेथेही मटक्‍याच्या चिठ्ठ्यांसह रोख 3 हजार 640 रुपये सापडले. तेथून एक मोबाइलसुद्धा जप्त केला.

अवश्य वाचा- भंडारा पोलिस, शाब्बास! क्रेडिट कार्डमधून पळवलेली रक्कम दिली मिळवून परत 

त्यानंतर चौधरीच्या घरी पोलिस पोहोचले. तेथूनही जुगाराचे साहित्य व आठ हजारांची रोकड जप्त केली. त्यानंतर काशीराम गौरच्याही घरातून 15 हजार 700 रुपयांची रोख रक्कम व जुगाराची सामग्री जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन. यांनी पोलिस कर्मचारी विजय इंद्रजित घुले याच्या निलंबनाचे आदेश जारी केले. घुलेसह पोलिसांनी मंगेश पंजाबराव चौधरी, काशिराम नारायण गौर व नीलेश रमेश मोरे या तिघांविरुद्ध अंजनगावसुर्जी ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यात चौघांना अटकही झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अवश्य वाचा- एसटीच्या मोफत पासचा असाही साईडइफेक्‍ट; ग्रामीण शाळांतील विद्यार्थीसंख्या लागली घटू... 

पैशाचा व्यवहार गौरकडे 

पोलिसांनी कारवाई केलेल्या गौर याच्याकडे आर्थिक व्यवहार सांभाळण्याची मोठी जबाबदारी होती, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. 

 

पोलिस कर्मचारी विजय घुले याने पोलिस दलाला न शोभणारे व जनमानसात या विभागाची प्रतिमा मलीन करणारे अशोभनीय काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली. 
-डॉ. हरिबालाजी एन., पोलिस अधीक्षक, अमरावती.  
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "The police had links with several gamblers; pottery was found in the house