esakal | कोरोना काळातही रेल्वेगाड्या फुल्ल, ट्रॅव्हल्स मात्र रिकाम्याच
sakal

बोलून बातमी शोधा

railways full even in corona time

कोरोनाकाळात लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये सावधगिरी म्हणून रेल्वेची चाके थांबविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष गाड्यांची घोषणा केली. यात कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली.

कोरोना काळातही रेल्वेगाड्या फुल्ल, ट्रॅव्हल्स मात्र रिकाम्याच

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : कोरोनामुळे बंद असलेल्या रेल्वे गाड्यात बर्थ रिकामे राहत होते. महत्त्वाचे काम असल्यास सावधानी बाळगून रेल्वेने प्रवास सुरू होता. परंतु, दिवाळी संपताच प्रवाशांची रेल्वेत गर्दी वाढली असून वर्ध्यातून जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे बर्थ फुल्ल झाले आहे. प्रवाशांच्या हाती वेटिंगचे तिकीट येत असले तरी रेल्वे प्रवासादरम्यान ही वेटिंग नगण्यच आहे. 

कोरोनाकाळात लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये सावधगिरी म्हणून रेल्वेची चाके थांबविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष गाड्यांची घोषणा केली. यात कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली. तरीसुद्धा बऱ्याच रेल्वे गाड्यांचे बर्थ रिकामे राहत होते. परंतु, दिवाळीचा सण आला आणि रेल्वेच्या गाड्यांत पूर्वीप्रमाणे वेटींगची वेळ आली. दिवाळीत आपापल्या घरी आलेला चाकरमान्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाण्याचा कार्यक्रम आखल्याने ही गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा - बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा...

वर्ध्यात रेल्वे प्रवासासाठी वर्धा मुख्य आणि सेवाग्राम रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जाते. यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून दक्षिणेकडील गाड्या जातात, तर वर्धा रेल्वे स्थानकावरून सर्वत्र जाणाऱ्या गाड्या जातात. यात सर्वात महत्त्वाची गाडी म्हणून विदर्भ एक्‍सप्रेस ठरते. पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांचाही यात समावेश असतो. या दोन ठिकाणी जाणाऱ्या गाड्या महत्त्वाच्या असून यात सर्वच बर्थ फुल्ल झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. यात सर्वसाधारण बर्थ तसेच एसीचेही बर्थ फुल्ल झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा - खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा अमरावतीत स्थानबद्ध 

ट्रॅव्हल्स मात्र रिकाम्याच - 
दिवाळीच्या काळात वर्धा, नागपुरातून सुटणाऱ्या ट्रॅव्हल्स फुल्ल असायच्या. यात तिकीटांचा दर गगनाला भिडल्याचे अनेकांच्या नजरेत आले आहे. पण, यंदा मात्र स्थिती विपरीत आहे. या काळातही येथून 900 रुपयांत तिकीट देण्यात येत आहे. या तिकिटात ट्रॅव्हल्स चालविणे शक्‍य नसल्याचे येथील एका व्यावसायिकाने सांगितले. यामुळे वाहन कसे चालवावे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या काळात उभ्या असलेल्या गाड्या सुरू झाल्यानंतर दिवाळीच्या काळात झालेले नुकसान भरून निघेल, असे ट्रॅव्हल्स चालकांना वाटले होते. पण तसे होताना दिसत नसून येत्या दिवसात पुन्हा गाड्या उभ्या ठेवाव्या लागतील की काय अशी चिंता त्यांना पडली आहे. 

हेही वाचा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

दिवाळीच्या काळात गाड्या फुल्ल असायच्या. दोन ते अडीच हजार रुपये तिकीट आकारण्यात येत होती. यंदा मात्र चित्र विपरीत आहे. या काळात परवडत नसलेल्या दरात गाड्या चालवाव्या लागत आहे. यामुळे येत्या काळात काय होईल सध्या सांगणे कठीण आहे. 
- विनायक नागपुरे, ट्रॅव्हल्स मालक