इतके वैर कशासाठी? पुन्हा धानाचे पुंजणे जाळले, चार दिवसांतील दुसरी घटना

संदीप रायपुरे
Thursday, 19 November 2020

दोन दिवसांपूर्वीही तीन लाख रुपयांचे दिडशे क्विंटल धानाचे पुंजणे जाळले होते. दोनदा अशी घटना घडल्याने शेतकरी पुरता हादरून गेला आहे. इतके वैर कशासाठी? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर ) : दिवाळीच्या आनंदात असताना आक्सापुरातील एका शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळल्याची घटना घडली आहे. यामध्ये जवळपास ४० क्विंटल धान जळून खाक झाले. दोन दिवसांपूर्वीही तीन लाख रुपयांचे दिडशे क्विंटल धानाचे पुंजणे जाळले होते. दोनदा अशी घटना घडल्याने शेतकरी पुरता हादरून गेला आहे. इतके वैर कशासाठी? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

हेही वाचा - Success Story: भाजी विकून आणि वृत्तपत्र वाटून 'तिने' गाठले भाभा ऑटोमिक...

ऋषी धोडरे, असे शेतकऱ्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या सात एकर शेतातील दिडशे क्विंटल धानाचे तीन पुंजणे जाळल्याची घटना घडली होती. त्याबाबत त्यांनी कोठरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. चौकशी सुरू असतानाच बुधवारी रात्री परत अडीच एकरातील धानाचे पुंजणे जाळल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ४० क्विंटल धान जळून खाक झाला. दोन दिवसांत दोन मोठे धक्के बसल्याने धोडरे कुटुंबीय हादरले. बुधवारच्या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले. तपासासाठी तत्काळ श्वानपथक बोलाविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा - फक्त दोन बोटांनी उचलता येणारी हलकी सायकल, पण किंमतीला...

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवीत जोगापूर येथील हरमेलसिंग डांगी, छत्तरसिंग डांगी, पंकजसिंग डांगी, कालीदास गेडाम या चौघांना ताब्यात घेतले. आज या चौघांनाही राजुरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दिवसांच्या अंतरात एका शेतकऱ्यांचे जवळपास दोनशे क्विंटल निघणारे धानाचे पुंजणे जाळण्याचे नेमके कारण काय? याबाबत पोलिस तपासानंतरच उलगडा होईल.

हेही वाचा - आयुर्वेदिक औषधांना सुवर्णकाळ; प्रतिकारशक्ती...

आक्सापुरातील शेतकऱ्याच्या धानाचे पुंजणे तब्बल दोनदा जाळल्याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
-तुषार चव्हाण, ठाणेदार, कोठारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice crop burned in gondpipari of chandrapur