सकल मराठा समाजाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरासमोर आंदोलन 

पुसद : आमदार इंद्रनील नाईक यांना घेराव घालून निवेदन देताना सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते. 
पुसद : आमदार इंद्रनील नाईक यांना घेराव घालून निवेदन देताना सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते. 

पुसद (जि. यवतमाळ) : येथे सकल मराठा समाजातर्फे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरासमोर मंडप टाकून सोमवारी, ता. २ नोव्हेंबर रोजी शांततापूर्वक घेराव घालून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. 

राज्य शासनाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने न्यायालयीन लढा गंभीरपणे घेऊन आरक्षण पूर्ववत करावे. आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढून आरक्षण कायम करावे.

आरक्षणाचा निर्णय त्वरित घेऊन विविध शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण घेण्यासाठी मराठा समाजातील युवक व युवतींना प्रवेश देऊन पदभरती सुरू करावी तसेच सारथी व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर प्रतिनिधी नेमावा, आदी मागण्यांच्या दृष्टीने राज्य शासनाचे व स्थानिक आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी पुसद येथील लोकप्रतिनिधी असलेले आमदार इंद्रनील नाईक यांना सकल मराठा समाजातर्फे घेराव घालून निवेदन दिले. 

दरम्यान, आमदार नाईक यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून त्या स्वत: आरक्षणाच्या बाजूने असल्याचे सांगितले व त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी लगेच भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून समाजबांधवांच्या भावना कळविल्या. अशोक चव्हाण यांनीसुद्धा समाजाच्या मागणीला पाठिंबा असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे सदर प्रकरण पाठवून स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

यावेळी सकल मराठा समाजाचे दीपक काळे, सुशांत महल्ले, कुलदीप गावंडे, शंकर गावंडे, अमोल उबाळे, करण ढेकळे, निळकंठ पाटील, दिगंबर जगताप, प्रकाश पानपट्‌टे, प्रभाकर टेटर, नितीन पवार, किरण देशमुख सवणेकर यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. 

मंगळवारी, 3 नोव्हेंबर रोजी आमदार ऍड. निलय नाईक व आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांना घेराव घालण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने मंत्री, खासदार व उर्वरित आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com