संकटाच्या काळात दारुड्यांसाठी धाऊन आली ताडी, काय आहे हा प्रकार?

Sale of Powder Mixed tady in Gadchiroli District
Sale of Powder Mixed tady in Gadchiroli District

गडचिरोली : निसर्ग संपदेने परिपूर्ण गडचिरोली जिल्हा... येथे फेब्रुवारी महिन्यापासून ताडीचा हंगाम सुरू होतो... अनेक नागरिक आवडीने ताडी हे पेय पितात... काही ठिकाणी आहारातही याचा समावेश होतो... हे पेय आता बाराही महिने उपलब्ध होऊ लागल्याने याचा नशेसाठी वापर होऊ लागला आहे... सध्या कोरोना विषाणुमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे... यामुळे दारू मिळणे कठीण झाले आहे... अशा परिस्थितीत दारुड्यांनी पावडरमिश्रित ताडीकडे आपला मोर्चा वळविला आहे. 

सध्या ताडीचा हंगाम सुरू आहे. काही भागांत मुबलक प्रमाणात ताडांची झाडे आहेत. मात्र, काही भागांत ताडाच्या झाडांची संख्या नगण्य आहे. तरीही काही परप्रांतीय नागरिक ताडी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या ताडीविक्री केंद्रांवर ताडी पिण्यासाठी ग्रामीण भागांतील युवक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. एका विशिष्ट भुकटीपासून ताडी सदृश्‍य द्रव्य तयार करून त्याची विक्री होत असल्याचे खुद्द ताडी पिणारेच सांगत आहेत. मात्र, या भुकटीपासून तयार ताडी पिण्याच्या नादामुळे अनेक युवकांचे कुटुंब चिंताग्रस्त झाले आहेत. 

चामोर्शी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये काही परप्रांतीय नागरिकांनी ताडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. काही भागांत ताडाची मोजकीच झाडे आहेत. मात्र, तरीही दिवस-रात्र ताडीविक्री होत असल्यामुळे इतकी ताडी या भागात येते कुठून, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ही ताडी 20, 30 आणि 50 रुपयात एक मग किंवा बाटली अशी मिळते. यातसुद्धा उच्च आणि कमी प्रतीच्या ताडीचा समावेश असतो. 

ताडी विक्रीतून हे विक्रेते दररोज हजारो रुपयांचा नफा कमवत आहेत. मात्र, पिणाऱ्यांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. आता कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीमुळे दारू मिळणे दुरापास्त झाले आहे. म्हणून दारूडे मिळेल तो मादक पदार्थ सेवन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. 

काय आहे ताडी?

ताडी हे ताडाच्या वृक्षातून मिळणारे द्रव आहे. झाडाच्या माथ्यावर तीक्ष्ण हत्याराने खाच पाडल्यावर त्यातून निघणारा हा द्रव्य... त्या खाचेखाली मडके बांधून द्रव्य गोळा करतात. हे द्रव्य थंड असतो. सूर्योदय झाल्यावर तो आंबतो. त्यापूर्वीच हा पिणे श्रेयस्कर असते. या रसाने मूत्रप्रवृत्ती वाढते. मूत्रविकार दूर होतात. तसेच उन्हाळ्यात पिल्याने उन्हाचा त्रास होत नाही. ताडीपासून गुळ व साखरही बनते. मात्र, ताडी अधिक आंबल्यावर पहिल्या तीन ते आठ तासांत तिच्यात तीन टक्के एथिल अल्कोहोल तयार होते. ही प्रक्रिया चालू राहिल्यास अल्कोहोल पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढते. त्याहून अधिक झाल्यास ताडी मादक होऊन आरोग्यास हानीकारक ठरते.

क्‍लोरल हायड्रेटवर संशयाची सुई

जिल्ह्यात ताडीमध्ये क्‍लोरल हायड्रेट मिसळवले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी मुंबई, नाशिक येथे पोलिसांनी ताडी विक्री केंद्रांवर छापा मारून हे रसायन जप्त केले होते. या रसायनामुळे मळमळणे, चक्कर येऊन तोल जाणे, उलटी होणे व अधिक वापर केल्यास बेशुद्ध होणे अशी लक्षणे आढळतात. याच्यामुळे मंदू व स्नायूंच्या हालचालींवर परिणाम होतो. तसेच कार्यक्षमेतवरही परिणाम होतो. भारतासह विदेशातही याच्या वापरावर बंदी आहे. हेच रसायन जिल्ह्यातील ताडीविक्रेते तर वापरत नाहीत ना, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com