अमरावतीत वाळू माफियांची मुजोरी, नायब तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न

sand mafiya try to beat a deputy tehsildar of bhatkuli in amravati
sand mafiya try to beat a deputy tehsildar of bhatkuli in amravati

अमरावती : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्यांनी निवासी नायब तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर चढविण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. इतकेच नाहीतर जिवे मारण्याची धमकी दिली. भातकुलीतील पेढी नदीपात्राजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

विनोद रामसिंग पवार व मयूर मधुकर भातकुलकर, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. भातकुली तहसील कार्यालयात विजय भाऊराव मांजरे हे निवासी नायब तहसीलदारपदावर कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळी विजय मांजरे हे अमरावतीवरून कार्यालयात भातकुली येथे जात होते. मार्गात त्यांना पेढी नदीच्या पात्रात एक ट्रॅक्‍टर उभा दिसला. त्यामुळे त्यांनी कार्यालयात जाऊन काही कर्मचाऱ्यांना सोबत घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह पेढी नदीचे पात्र गाठले. यावेळी त्यांना ट्रॉलीतून वाळूची वाहतूक होताना दिसली. त्यामुळे त्यांनी वाहनचालकास परवाना व रॉयल्टी पासबाबत विचारणा केली. त्यावर चालकाने त्यांना पास दाखविली नाही. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. परंतु, वाळू नेणाऱ्यांनी ट्रॅक्‍टर ट्रॉलीतील वाळू त्याच ठिकाणी उलटवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूरज नागमोते व त्याच्या सहकाऱ्यांनी विजय मांजरे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. निवासी नायब तहसीलदारांसह सहकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर चढविण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखून आपले प्राण वाचविले.

या घटनेनंतर विजय मांजरे यांनी भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर विनोद पवार व मयूर भातकुलकर यांना अटक करण्यात आली. सूरज नागमोते अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेतील दोघांना बुधवारी (ता.30) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com