दुख:द बातमी... प्रत्येक टप्प्यावर यश संपादित करणारे सोमेश्वर पुसदकर यांचे निधन

Shivsena Leader Someshwar Pusadkar passed away
Shivsena Leader Someshwar Pusadkar passed away

अमरावती : दशक १९९० चा... एक तरुण राजकारणात येतो... शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा प्रवास करतात... या प्रवासात कधीच वादग्रस्त ठरत नाही... ते वादग्रस्त न ठरणारे जिल्ह्यातील बहुदा पहिले पदाधिकारी... त्यांच्या बहुआयामी कार्यामुळेच जनमानसासोबतच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडीचेही बनले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय झाले. मात्र, एका आजाराने त्यांचे निधन झाले आणि शांत, संयमी लढवय्या पर्वाचा अस्त झाला. 

१९९०च्या दशकात तरुण वयात शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आलेले मितभाषी सोमेश्वर पुसदकर बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. थोरले बंधू दत्ताभाऊ पुसदकर यांच्या अपघाती निधनानंतर कुटुंबासह पक्षाची जबाबदारी आलेल्या सोमेश्वर यांनी दोन्ही बाजू सक्षमतेने सांभाळल्या, नव्हे तर निभावल्यात. शांत व संयमी वृत्तीच्या सोमेश्वर पुसदकर यांची पक्षात मॅनेजमेंट गुरू अशीही ओळख होती.

सभा, मेळावा, प्रचारसभा असो किंवा सामाजिक कार्यक्रम तो भव्यदिव्य झाला पाहिजे, अशी व्यवस्था ते करीत होते. त्यांनी आयोजित केलेली शिवसेनाप्रमुखांची जाहीर सभा, कृषी मेळावे, हास्य कविसंमेलन, संगीत कार्यक्रम, उद्योजकांचा मेळावा हे त्यांच्या उत्कृष्ट आयोजनाची साक्ष आजही देतात. सामाजिक व साहित्य क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. 

विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रा. बी. टी. देशमुख यांच्यासोबत विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषावरील लढाई, त्यासाठी औष्णिक वीज प्रकल्पाच्या विरोधातील न्यायालयीन लढाई, शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान मिळावे, यासाठी कृषी मेळावे त्यांनी आयोजित करून ते यशस्वीही केले. साहित्याच्या क्षेत्रात स्व. सुरेश भट स्मृती प्रतिष्ठान स्थापन करून नवोदित साहित्यिकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आझाद हिंद मंडळाचा गणेशोत्सव विदर्भच नव्हे तर राज्यात नावारूपास त्यांनी आणला. गणेशोत्सवाचा मूळ हेतू प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी सदैव उतरविला. 

यशाचा उपयोग गरजूंसाठी केला

राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांच्या महत्त्वच्या भूमिका आहेत. यश पायावर लोळण घालत असताना वैयक्तिक हित बाजूला ठेवून त्यांनी यशाचा उपयोग गरजूंसाठी केला. परिवहन मंडळ, जिल्हा बँक, म्हाडा या विविध प्राधिकरणावर काम करताना त्यांनी गरजूंना नेहमी मदतीचा हात दिला. त्याचीच परिणती अनेक कुटुंबे आज पोट भरत आहेत.

बांधकाम क्षेत्रातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न

बांधकाम क्षेत्रातही त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तरुण उद्योजकांना या क्षेत्रात आणण्यासाठी अमरावतीत त्यांनी देशातील ख्यातनाम उद्योजकांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया करून दाखविली. विदर्भातील अनेक नामवंत संस्थांसोबत त्यांची जवळीक त्यांनी नेहमी समाजासाठी खर्ची घातली. 

कर्करोगासमोर टेकावे लागले हात

शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा प्रवासाचा दीर्घ पल्ला यशस्वी पार करणारे सेनापती सोमेश्वर पुसदकर यांचा फुफ्फुसाचा कर्करोग या आजाराने मृत्यू झाला. प्रत्येक टप्प्यावर यश संपादित करणाऱ्या या शांत व संयमी व्यक्तिमत्त्वाला मात्र कर्करोगासमोर हात टेकावे लागले. जिल्हा शिवसेनेतील एक संयमी, अभ्यासू व लढवय्ये पर्व यामुळे संपले. त्यांचे अचानक जाणे मनाला चटका लावणारे ठरले. 

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com