"तुम्हाला केवळ शेतकऱ्यांचे पैसे लुबाडायचे आहेत" असं म्हणत शिवसेनेच्या संपर्कप्रमुखानं व्यवस्थापकाला केली जबर मारहाण

Shivsena leader from Yavatmal beat insurance officer
Shivsena leader from Yavatmal beat insurance officer

यवतमाळ ः विमा कंपनी पिकांचा विमा करून शेतकऱ्यांना लुटत आहे, असा आरोप करीत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी आज यवतमाळमध्ये ‘जवाब दो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान इफ्कोटोकियो कंपनीचे पुणे येथील व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्यासोबत खासदार गवळी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यवस्थापक सुरोशे यांच्या अंगावर सोयाबीन टाकून त्यांना मारहाण केली.

कक्षात चर्चेला बसल्यावर खासदार गवळी यांनी निवेदनाची प्रत व्यवस्थापक सुरोशे यांच्यासमोर टेबलवर फेकून दिली. त्यानंतर त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. ‘तुम्हाला केवळ शेतकऱ्यांचे, सरकारचे पैसे लुबाडणेच तेवढे माहिती आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्हाला माहिती आहेत का? शेतकरी आत्महत्येचा जिल्हा आहे हा. सोयाबीन कसे असते, आकाराने केवढे असते, हे तरी माहिती आहे का तुम्हाला’, असे विचारत संतोष ढवळे उठले आणि सुरोशेंच्या अंगावर गेले.

ढवळे यांनी व्यवस्थापकांना अचानक मारहाण सुरू केल्यामुळे सर्वांना धक्का बसला आणि एकच पळापळ झाली. सुरोशेंच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने आधी त्यांचा बचाव केला आणि ढवळेंना बाहेर काढले. त्यानंतर ‘आम्ही बघू आता आमच्या पद्धतीने, काय करायचे ते’, असे म्हणत खासदार गवळीसुद्धा कक्षातून बाहेर पडल्या. यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुनगंटीवार, महेश पवार आणि शिवसैनिक तेथे होते.

उच्च न्यायालयात लढा देणार..

जिल्ह्यात १५-१५ दिवस सतत अतिवृष्टी झाली. त्यामध्ये पिकांचे भारी नुकसान झाले. इफ्कोटोकियो कंपनीने चार लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढला आणि केवळ ९७७६ शेतकऱ्यांनाच नुकसानाची भरपाई दिली. उर्वरित शेतकरी आणखी संकटात सापडले. राज्य सरकारच्या कृषी विभागाने जे सर्वे केले आहेत, त्यानुसार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा या कंपनीच्या विरोधात लढा आणखी तीव्र करू. याशिवाय उच्च न्यायालयात आणि ग्राहक न्यायालयातही आम्ही ही लढाई लढणार आहोत, असे खासदार भावना गवळी आज म्हणाल्या. 


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com