वाहन चालवताय, जरा जपून ही आहे गतवर्षीच्या अपघातातील मृत्यूसंख्या

file photo
file photo

यवतमाळ : घरून उशिरा निघायचे आणि ठरलेल्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी वाढविण्यात येणारा वाहनाचा वेग जिवावर बेतत आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांत जिल्ह्यात रोजचचे बळी जात आहेत. वर्षाला बळींची आकडेवारी साडेतीनशेच्या घरात आहे. 

गेल्या काही वर्षांत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या घरात एक, दोन दुचाकी ठरलेल्या आहेत. रस्तेही चकाचक झालेले आहेत. त्यामुळे वाहनचालक कोणतीही पर्वा न करता बेदरकार वाहने चालवितात. निष्काळजीपणामुळे आपला किंवा दुसऱ्या व्यक्तीचा जीव जाईल, याचा विचार करीत नाहीत. वेगाशी स्पर्धा करण्याला प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. बहुतांश चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत.

हेल्मेट अपवादानेच वापरले जाते

हेल्मेट अपवादानेच वापरले जाते. जास्तीत जास्त मृत्यू हे डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्यानेच होत असल्याचे वास्तव आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यापासून सिमेंट रोडवर होणाऱ्या अपघातांत डोक्‍याला दुखापत होऊनच मृत्यू होत असल्याचे पोलिस सांगतात. गेल्या 2018 या वर्षात एक हजार 401 अपघात झालेत. त्यात 350 जणांचे मृत्यू तर, 550 व्यक्ती जखमी झाले. 2019मध्ये झालेल्या एक हजार 48 अपघातांत 366 मृत्यू होऊन 485 व्यक्ती जखमी झाले आहेत. वाहतूक शाखा व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रस्तासुरक्षा सप्ताह राबविण्यात येतो. तरीदेखील नागरिक सुरक्षित प्रवास करीत नाहीत, ही बाब आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

गावानजीक रस्त्याचा अभाव

महामार्गाच्या रस्ते रुंदीकरणाचे काम युद्घस्तरावर करण्यात आले आणि अजूनही सुरूच आहे. सुरक्षेच्यादृष्टीने डिव्हायडर टाकण्यात आलेत. मात्र, गावात जाण्यासाठी रस्ता सोडण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना दूर अंतरावर जाऊन पलटावे लागते. अनेकदा वाहनचालकांना प्रवास हा रॉंग साइडदेखील करावा लागतो. त्यामुळेही अपघात होत आहेत. 

मद्यप्राशन करून कधीही वाहन चालवू नये. चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्टचा तर, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. चालकांनी मोबाइलचा वापर टाळावा. घरी आपली कुणी वाट बघत आहे. हे कायम लक्षात ठेवावे. 
अनिल किनगे
पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, यवतमाळ. 

अशा आहेत घटना

महिना-अपघात-मृत्यू
जानेवारी-113-32
फेब्रुवारी-94-28
मार्च-83-27
एप्रिल-87-41
मे-107-43
जून-82-35
जुलै-81-28
ऑगस्ट-88-20
सप्टेंबर-80-26
ऑक्‍टोबर-55-25
नोव्हेंबर-80-39
डिसेंबर-98-22
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com