पोलिसच म्हणाले, ‘...तर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करू, मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळविणे कठीण जाईल’, वाचा हृदयद्रावक घटना

son accept father's death body after four days in Amravati
son accept father's death body after four days in Amravati

अमरावती : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पित्याचा मृतदेह स्वीकारण्याची मुलाची मानसिकता दिसत नव्हती. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून पोलिसांच्या भाषेत त्याची समजूत काढली. मृतदेह न स्वीकारल्यास पोलिस बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करतील. पित्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळविणे कठीण जाईल. यासह विविध मुद्दे सांगितल्याने मुलगा वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास तयार झाला. चौथ्या दिवशी सायंकाळी मुलगा काही लोकांना घेऊन इर्विनच्या शवागारासमोर आला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह मुलाच्या स्वाधीन केला. जन्म देणाऱ्या पित्यावर त्याच्या मृत्यूनंतर असा प्रसंग ओढविल्याबद्दल पोलिसांनी देखील दु:ख व्यक्त केले.

दर्यापूर तालुक्‍यातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान कोविड रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. रुग्णालय प्रशासनाने एकुलत्या एक मुलाला वडिलांच्या निधनाची माहिती दिली. मृतदेह त्याच दिवशी सायंकाळी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला होता. मात्र, तीन दिवस लोटूनही अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेण्यासाठी मुलगा इर्विनमध्ये आलाच नाही.

इर्विनच्या पोलिसांनी माहिती देण्यासाठी वारंवार मुलाशी संपर्क केला. सुरुवातीच्या संभाषणानंतर मुलाने मोबाईल स्वीचऑफ करून ठेवला. इर्विन चौकीतील पोलिसांचा संपर्क सतत सुरूच होता. मुलगा येत नसल्याचे बघून मृत्यूचा मेमो कोतवाली ठाण्यात दिला गेला. चौथ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पुन्हा इर्विन चौकीतील पोलिसांनी मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधला तेव्हा त्याने फोन उचलला असता मृतदेह ताब्यात घेण्यासाठी इर्विनमध्ये येण्यास सांगितले.

चार दिवसांनी स्वीकारला मृतदेह

कोरोना विषाणूची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वडिलांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाल्यानंतर मुलाने मृतदेह स्वीकारण्यासाठी चक्क चार दिवस लावल्याची धक्कादायक घटना शहरात उजेडात आली आहे.

अनेकांची मानसिकता बदलली
मृत्यू कुणाचाही होवो वाईटच वाटते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेकांची मानसिकता बदलली आहे. कोविडने मृत्यू झालेल्यांचा मृतदेह स्वीकारण्यासाठी मानवतेच्या दृष्टीने विचार करावा. सकारात्मक मानसिकता ठेवा.
- डॉ. श्‍यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती

जबाबदारी ढकलणे योग्य नाही
प्रशासनावर प्रत्येक जबाबदारी ढकलणे योग्य नाही. कठीण परिस्थितीत मदतीचा हात पुढे करा. कोविडमुळे मृत्यू झालेल्या काहींवर नातेवाईक न आल्याने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागतात.
- डॉ. सीमा नैताम,
आरोग्य अधिकारी, महापालिका

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com