टार्गेट २०२१ : अमरावतीतील धनुर्धर म्हणतेय, आगामी स्पर्धेत राखणार विजयाची मालिका

target set for 2021 says archer purvasha shende from amravati
target set for 2021 says archer purvasha shende from amravati

अमरावती : मागील १२ वर्षांपासून सातत्याने विविध स्पर्धा गाजविणाऱ्या अमरावतीच्या पूर्वशा सुधीर शेंडे हिने आगामी स्पर्धेतसुद्धा आपल्या विजयाची मालिका कायम राखण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी केली आहे. कोरोनाच्या काळात मैदानावरील सरावात खंड पडला असला तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या फीट राहण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. वडील सुधीर शेंडे यांची मिळालेली साथ पूर्वशाला प्रचंड बळ देणारी ठरली.

एखाद्या खेळात तब्बल एका तपापासून सातत्य कायम ठेवून पदकांची कमाई करणे हे कोणत्याही खेळाडूसाठी अतिशय जिकरीचे आहे. असे असतानाही अमरावतीच्या पूर्वशा शेंडे या आर्चरने ही कमाल करून दाखविली आहे. कोरोनाचा काळ हा सर्वच खेळाडूंसाठी अतिशय कठीण होता. सरावातील सातत्य खंडित झाल्याने शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या स्वतःला फीट ठेवण्याचे सर्वांत मोठे आव्हान होते. असे असतानाही पूर्वशाने तिच्या घराच्या अंगणात टार्गेट लावून सराव केला. यासोबतच सायकलिंग, योगा, प्राणायाम, वर्कआउटच्या माध्यमाने स्वतःला फीट ठेवले. नुकतेच ट्रेकिंग करून ती परतली असून या माध्यमातूनसुद्धा नवी ऊर्जा मिळाल्याचे पूर्वशाने सांगितले. सातत्याने विविध स्पर्धेत भाग घेत असल्याने पूर्वशा घराबाहेरच राहत होती. परंतु या कोरोनाच्या काळात मार्च महिन्यापासून कुटुंबासोबत राहण्याची संधी तिला मिळाली. 

आजवर तिने अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. सिंगापूर येथे झालेल्या वल्र्डकपमध्ये सुवर्णपदक, बाराव्या साउथ एशिया गेम्समध्ये सुवर्णपदक, पहिल्या आशिया कप स्पर्धेत थायलंड येथे सुवर्णपदक असे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आजवर पाच सुवर्ण, तेवढेच सिल्व्हर व तीन कांस्यपदकांची कमाई तिने केली आहे. यासोबतच राष्ट्रीय स्पर्धेत १२ सुवर्णपदक, ११ रजत व ९ कांस्यपदकांची कमाई तिने केली. गेल्या १२ वर्षांपासून खेळात सातत्य ठेवणारी ती अमरावतीची एकमेव खेळाडू ठरली आहे. 

परिस्थितीला विरोध न करता आपल्याकडे जी साधने आहेत त्याच्या माध्यमातून आपला सराव सुरू ठेवणे आवश्यक असल्याने मी आहे त्या स्थितीचा स्वीकार करून सराव सुरू ठेवला. या काळात काही उणिवा दूर करण्यास मदत झाली. कोरोनाच्या काळात मानसिकदृष्ट्या स्वतःला कणखर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. यंदा स्पर्धा झाली नसली तरी येणाऱ्या स्पर्धेसाठी माझी तयारी सुरू आहे. त्यामुळे टार्गेटवर हीट करण्यासाठी मी सज्ज असल्याचे पूर्वशा शेंडे हिने सांगितले. 

वडिलांची भक्कम साथ -
पूर्वशाचे वडील सुधीर शेंडे हेच तिचे मार्गदर्शक, कोच तसेच फिटनेस एक्स्पर्ट आहेत. त्यांनी पूर्वशाला तिचे लक्ष्य गाठण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. क्रीडाक्षेत्रात मुलीने प्रचंड झेप घ्यावा, यासाठी पित्याने केलेला त्याग व समर्पण पूर्वशाला बळ देणारे ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com