अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार म्हणजे होणारच; पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा सूतोवाच

क्रिष्णा लोखंडे
Sunday, 24 January 2021

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली.

अमरावती : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा शनिवारी (ता. २३) बैठकीत झाली असून त्याबाबतच्या कार्यवाहीला वेग आला आहे. अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार म्हणजे होणारच, असा ठाम विश्‍वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा - शिक्षकांची परत एकदा 'कोविड' परीक्षा; शाळेसाठी प्रशासन सज्ज; काहींची दुसऱ्यांदा टेस्ट

 

याबाबत यापूर्वी निवेदनही देण्यात आले होते. महाविद्यालयाबाबत कृती समितीकडून पाठपुरावा होत आहे. कृती समितीच्या मान्यवर सदस्यांशीही पालकमंत्र्यांनी यापूर्वी चर्चा केली आहे व ही मागणी कॅबिनेटमध्येही मांडली.

कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याची कार्यवाही गतिमान झाली आहे.

शासन सकारात्मक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासन पूर्णत: सकारात्मक आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा निधी व इतर गोष्टींची पूर्तता वेगाने होण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणारच आहे. त्याबाबत कुणीही शंका बाळगू नये व कसलाही संभ्रम ठेवू नये, असे ठाम प्रतिपादन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा, अलिबाग, नंदूरबार व अमरावती या चार जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे. अमरावती जिल्हा हे विभागीय मुख्यालयाचे ठिकाण आहे. जिल्ह्यात मेळघाट व कुपोषणग्रस्त आदिवासीबहुल क्षेत्र बालमृत्यू व मातामृत्यू दर मोठ्या प्रमाणात आहे.

अमरावतीतच होणार उपचार

अनेक उपचारांसाठी नागपूरला जावे लागते तसेच कोरोना साथीसारख्या आजारात रुग्णसेवेसाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्‍यक आहे, असे निवेदन पालकमंत्र्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यासह मान्यवरांना दिले होते.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be a government medical college in Amravati: Guardian Minister Yashomati Thakur