नागपूर : अवघ्या वीस मिनिटात चोरटे गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

मोबाईल चोरून त्याने अन्सारीकडे सोपवून दिला. दोघेही तिथून निघून गेले. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच मयंक आरपीएफ ठाण्यात पोचला. घटनेची माहिती देताच सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील जवान भूपेंद्र बाथरी यांनी फुटेज तपासणी केली.

नागपूर : क्षणिक मोहातून दोघांनी संगनमताने मोबाईल चोरला. घटनेनंतर आरपीएफ जवानांनी अवघ्या वीस मिनिटांमध्ये त्यांना हुडकून काढले आणि दोघांवरही गजाआड जाण्याची वेळ आली. नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी हा घटनाक्रम घडला.
 
मोहम्मद साजिद (22) आणि तोहिद सलीम अन्सारी (25) अशी चोरट्यांची नावे आहेत. दोघेही जबलपूरचे रहिवासी आहेत. कामासाठी ते नागपुरात आले होते. गावी परतण्यासाठी शनिवारी ते नागपूर स्थानकावर आले. त्याचवेळी व्हीएनआयटीचा विद्यार्थी मयंक जैन (20) हासुद्धा नागपूर रेल्वेस्थानकावर तिकीट घेण्यासाठी तिकीट आरक्षण केंद्रात आला होता. दुपारी 3.30 वाजता तो रांगेत लागून तिकीट घेत असताना, त्याच्या खिशात महागडा मोबाईल होता. बघताक्षणीच साजिदला तो चोरण्याचा मोह अनावर झाला.

"तो मी नव्हेच'चा पवित्रा
मोबाईल चोरून त्याने अन्सारीकडे सोपवून दिला. दोघेही तिथून निघून गेले. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच मयंक आरपीएफ ठाण्यात पोचला. घटनेची माहिती देताच सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील जवान भूपेंद्र बाथरी यांनी फुटेज तपासणी केली. त्यात मोबाईल चोरीची घटना स्पष्टपणे दिसून आली. लागलीच सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, अनीस खान नवल सिंह ढाबेराव, मनुश कुमार गौतम, नितेश ठमके जवाहर सिंह यांना चोरट्यांची माहिती देत, सीसीटीव्हीवरूनही त्याचा पाठलाग करणे सुरू ठेवले.
ही बातमी अवश्य वाचा - जीपने केला पाठलाग अन्‌ मंगेशचा झाला गेम

हिसका दाखविताच चोरीची कबुली
15.50 वाजताच्या सुमारास दोन्ही चोरटे प्रवेशद्वाराजवळ दिसून आले. त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन ठाण्यात आणण्यात आले. प्रारंभी त्यांनी "तो मी नव्हेच'चा पवित्रा घेतला. हिसका दाखविताच मात्र त्यांनी चोरीची कबुली दिली. सोबतच अन्सारीने त्याच्याकडे ठेवलेला मोबाईलही काढून दिला. पुढील कारवाईसाठी दोन्ही चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ठळक बातमी - प्राणहिता नदीत नाव उलटून दोन प्रवाशांना जलसमाधी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested in just twenty minutes