अमरावतीत घरफोडी, ३ लाख ७६ हजारांच्या दागिन्यांची चोरी

संतोष ताकपिरे
Saturday, 14 November 2020

केवल कॉलनी जवळच्या एल.आय.सी. कॉलनीमध्ये 3 लाख 76 हजारांचे दागिने चोरीला गेले.  ही घटना शुक्रवारी (ता.13)उघडकीस आली.

अमरावती : गाडगेनगर परिसरात धाडसी घरफोड्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. केवल कॉलनी जवळच्या एल.आय.सी. कॉलनीमध्ये 3 लाख 76 हजारांचे दागिने चोरीला गेले.  ही घटना शुक्रवारी (ता.13)उघडकीस आली.

हेही वाचा - घरी सुरू होती दिवाळीची तयारी अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

नरेंद्र माणिक गोंडाणे (वय 48, रा. केवल कॉलनी) यांच्या निवासस्थानी ही घरफोडी झाली. गोंडाणे कुटुंबीय काही दिवसांपूर्वी 10 नोव्हेंबरला गुजरातला नातेवाइकांकडे गेले होते.  ते शुक्रवारी(ता.13) सकाळी अमरावतीत परतले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. घरातील दोन खोल्या, हॉलमधील कपाटे उचकटून सामग्री अस्ताव्यस्त केली होती. 40 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, 10 ग्रॅमची एक चेन, 40 ग्रॅम सोन्याच्या मण्यांचा हार, 4 ग्रॅमची एक अंगठी, असा तीन लाख 76 हजारांचा एकूण ऐवज चोरी गेल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीही गाडगेनगर हद्दीत मोठ्या घरफोडीच्या घटना घडल्या. श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या. धाडसी घरफोडीनंतर काही सराईतांची चौकशी केली. परंतु, पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. गोंडाणे यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - खासदार नवनीत राणा धडकणार मातोश्रीवर; मुख्यमंत्री पत्राला उत्तर देत नसल्याचा आरोप

तोतया बँक अधिकाऱ्याने लुबाडले 50 हजार रुपये -

एका खातेदाराला तोतया बँक अधिकाऱ्याने बडा साहेब बोलत असल्याची बतावणी केली. प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सदर व्यक्तीच्या खात्यातून 49 हजार 998 रुपयांची रोकड दुसरीकडे वळती केली.

हेही वाचा - पिकांच्या संरक्षणासाठी शेती सभोवताल लावत होते विद्युत तार; शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

उमेशचंद्र सुखराम आकोडे (वय 46, तेलंगनगर, कळमखार), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. धारणी पोलिसांनी आकोडे यांच्या तक्रारीवरून तोतया बँक अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी  आकोडे यांच्या मोबाईल क्रमांकावर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा बडा साहेब बोलत असल्याचे सांगितले. एटीएम कार्ड बंद होत आहे. त्याला अपडेट करायचे असल्याचे सांगून एटीएम कार्डवरील 16 अंकी नंबर मागून त्यामागे असलेला अतिरिक्त दोन अंक सांगायला भाग पाडले. आकोडे यांनी तोतया बँक अधिकाऱ्याला विश्‍वासाने कार्डची गोपनीय माहिती शेअर केली असता, काही मिनिटात त्यांच्या खात्यामधून सलग दोन टप्प्यात 24 हजार 999, असा 49 हजार 998 रुपये स्वत:च्या खात्यात वळते करून फसवणूक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thieves stolen jewelry in amravati