घरकुल लाभार्थ्यांच्या उपोषणाची तिसऱ्या दिवशी सांगता; दोन दिवसांत लाभ देण्याचे आश्वासन

रफीक कनोजे
Friday, 23 October 2020

सन २०१८ पासून संघर्ष करीत असलेल्या ३६ घरकुल लाभार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागणीला प्रशासन दिरंगाई करीत असल्याने झरी जामणी तालुका पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी उपोषणाचे तिसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणाला पाठिंबा घोषित केला. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाचे धाबे दणाणले.

झरी जामणी (जि. यवतमाळ) : झरी जामणी येथील बस स्टँड चौकात तीन दिवसांपासून जंगोम दल झरी जामणी दलाच्या वतीने सुरू असलेले उपोषण तिसऱ्या दिवशी बुधवारी नगर पंचायत झरी जामणीचे कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अधिकारी चंद्रकांत पवार यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले.

झरी नगर पंचायत मार्फत पंतप्रधान घरकुल आवास योजनेअंतर्गत सन २०१८ मध्ये ३६ लाभार्थ्यांना घरकुल मिळाले. त्या लाभार्थ्यांनी राहत्या घराच्या जागेवर जुने घर मोडून नवीन घराचे बांधकाम सुरू केले. काहींचे जोता लेवल, काहींचे छत लेवलपर्यंत कामे झालेली आहेत. दोन वर्षांपासून निधीअभावी बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात वारंवार संघर्ष व उपोषण सुध्दा केले.

जाणून घ्या - अबब! नागपुरात जन्माला आले चक्क पाच किलो वजनाचे बाळ

त्यावेळेस उडवाउडवीचे उत्तर व दिशाभूल करून खोटे लिखित आश्वासन दिले. शेवटी झालेल्या कामाचा निधी न मिळाल्याने त्रस्त होऊन १९ ऑक्टोबरला जंगोम दलाचे तालुका अध्यक्ष कालिदास अरके, गजानन मडावी, राजू शेख, पिंटू सोळंकी यांनी घरकुल आवास योजनेचा पैसे खात्यात जमा करीत नाही तोपर्यंत उपोषण माघार घेणार नसल्याचा निर्धार करीत उपोषणास बसले.

उपोषणस्थळी मंगळवारी दुसऱ्या दिवशी जंगोम दलचे जिल्हाध्यक्ष नीलेश पंधरे, अखिल भारतीय कोया पुणेम भूमक मांदिचे जिल्हाध्यक्ष चेतन कुडमेथे, विद्यार्थी संघ महाराष्ट्र अध्यक्ष विकास कुडमेथे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई वरखडे यांनी भेट देऊन समर्थन देत मंगळवारी दुसऱ्या दिवशी तब्बल चार तास नगरपंचायत झरीचे मुख्याधिकारी यांना घेराव घेऊन जाब विचारला व उपोषण कर्त्याच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. परंतु, दोन दिवस होऊनही यांच्या उपोषणास नगर पंचायतचे अधिकाऱ्यांनी ठोस निर्णय दिला नाही.

सविस्तर वाचा -  Video गावाचा सुपुत्र निघाला आर्मीत; गावकऱ्यांनी दिला आगळावेगळा निरोप

सन २०१८ पासून संघर्ष करीत असलेल्या ३६ घरकुल लाभार्थ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांच्या मागणीला प्रशासन दिरंगाई करीत असल्याने झरी जामणी तालुका पत्रकार संघटनेच्या सर्व सदस्यांनी उपोषणाचे तिसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता उपोषणस्थळी भेट दिली व उपोषणाला पाठिंबा घोषित केला. त्यामुळे नगर पंचायत प्रशासनाचे धाबे दणाणले.

नगर पंचायत झरी जामणीचे कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अधिकारी चंद्रकांत पवार यांनी उपोषण मंडपात जाऊन दोन दिवसांत ३६ घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात ३२ लाख ४० हजार रुपये टाकण्याचे व दुसऱ्या टप्यातील एकूण १५४ घरकुल मंजूर होऊन त्याचा निधी सुध्दा तात्काळ खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता उपोषणार्थींना लिंबू पाणी देऊन सांगता करण्यात आली.

क्लिक करा - मोबाईलवर लिंक पाठवल्यानंतर आला फोन; माहिती भरल्यानंतर तरुणी लागली रडायला

सहाव्या दिवशी तोडफोड आंदोलन करू
नगर पंचायत झरी जामणीचे कर निर्धारक व प्रशासकीय सेवा अधिकारी चंद्रकांत पवार यांनी घरकुलसाठी मंजूर झालेला निधी खात्यामध्ये जमा करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी मांगितला आहे. आम्ही त्यांना पाच दिवसांचा अवधी दिला. पाचव्या दिवशी घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही तर सहाव्या दिवशी दिवशी मंगळवारी (ता. २७) नगर पंचायत कार्यालयात घुसून तोडफोड आंदोलन करू. याला सर्वस्वी जबाबदार नगर पंचायत प्रशासन राहील.
- कालिदास अरके,
तालुका अध्यक्ष जंगोम दल, झरी जामणी

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the third day of the fast of the Gharkul beneficiaries