विदर्भात दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या; परतीच्या पावसाने पिकांची हानी झाल्याने होते निराश

Two young farmers commit suicide in Vidarbha
Two young farmers commit suicide in Vidarbha

नागपूर : परतीच्या पावसाने पिकांची झालेली हानी पाहून विदर्भात दोन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. हे दोन दुर्दैवी शेतकरी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात असलेल्या चालबर्डी येथील तरुण शेतकरी किरण हनमनलू गोणेवार यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. किरण गोणेवार यांच्याकडे साखरा शेतशिवारात वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. यावर्षी परतीच्या पावसाने पिकांची अपरिमित हानी झाल्याने खासगी सावकारी कर्जाची परतफेड कशी करावी याच विवंचनेत ते होते. त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलून चालबर्डी ग्रामपंचायत मालकीच्या शेतात गळफास घेतला.

दुसऱ्या घटनेत अमरावती जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्‍यात असलेल्या वाघोली येथे धीरज मानकर (वय २७) या युवा शेतकऱ्याने मंगळवारी घरात गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी आई-वडील शेतातून परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. कर्ज घेऊन सोयाबीन, कपाशी, तूर पेरली होती. यंदा सोयाबीनने दगा दिला व इतर पिकांची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे धीरज चिंतेत राहायचा, असे धीरजचे वडील रमेश मानकर यांनी सांगितले.

वीज तार गुंडाळून शेतकऱ्याची आत्महत्या

दोन ते तीन दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे शेतकऱ्याने पायाला जिवंत वीज तार गुंडाळून आत्महत्या केली होती. पंजाबराव माधवराव गावंडे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे केवळ एक हेक्‍टर शेती आहे. शेतातील तोकड्या उत्पन्नामुळे ते सातत्याने गरिबीशी दोन हात करीत होते. त्यात मागील तीन वर्षांपासून त्यांच्या पत्नीला पॅरालिसिसचा आजार झाल्याने ते प्रचंड विवंचनेत होते. यंदा परतीच्या पावसाने शेतातील कपाशी नेस्तनाबूत केली. या संकटाच्या मालिकेमुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

युवा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे परतीच्या पावसामुळे धानपिकाचे झालेले नुकसान पाहून खचलेल्या युवा शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. योगेश्‍वर मोहन तिरपुडे (रा. इटखेडा) असे या युवकाचे नाव आहे. योगेश्‍वरने साडेआठ एकरात धानाची लागवड केली. यासाठी जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च झाला. कर्ज काढून त्याने शेतजमीन कसली. मात्र, काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने धानपीक नष्ट झाले. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, याची चिंता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने बुधवारी सकाळी शेतशिवारात गळफास लावला. ही बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्याला गळफास लावण्यापासून रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com