नॅकचा दर्जा मिळेल कसा? अद्याप रिपोर्टच पाठवला नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला दहा डिसेंबरपर्यंत नॅकसाठी सेल्फ स्टडी रिपोर्ट पाठवायचा होता. मात्र, विद्यापीठाने अद्याप रिपोर्ट पाठवला नसल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला गेल्यावेळी नॅकचा "अ' दर्जा मिळाला होता. त्यासाठी मिळालेल्या प्रमाणपत्राची मुदत डिसेंबरपर्यंत आहे. मात्र, नियमाप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी विद्यापीठाने सेल्फ स्टडी रिपोर्ट पाठविणे आवश्‍यक असताना, हा रिपोर्ट नॅककडे पाठविण्यात आला नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यासाठी असलेली 10 डिसेंबरचीही मुदत संपली असताना विद्यापीठाकडून अद्यापही रिपोर्टच तयार नसल्याचे समजते.

विद्यापीठातील गुणवत्तेचा दर्जा ठरविण्यासाठी दर पाच वर्षांनी नॅकचे मूल्यांकन करण्यात येते. यापूर्वी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे इंटरनल क्वॉलिटी एश्‍युरन्स सेलचे (आयक्‍युएसी) प्रमुख असताना त्यांनीच हा अहवाल सादर केला होता. यावर्षी डिसेंबर महिन्यात "नॅक' मूल्यांकनासाठी समिती येणार असल्याने मार्चमधील अर्थसंकल्पात तयारीच्या दृष्टीने बरीच भरीव तरतूद करण्यात आली. या तरतुदीतून "नॅक'चा ग्रेडस सुधारण्यासाठी बराच मोठा संकल्प करण्यात आला. त्यादृष्टीने आयक्‍युएससी सेलच्या प्रमुखांना निर्देशही देण्यात आले.

 

क्लिक करा -  अंत्यसंस्काराला गेले अन्‌ दुचाकी गमावून बसले 

 

मात्र, सहा महिन्यांपूर्वी नॅकसाठी आवश्‍यक असलेला "सेल्फ स्टडी रिपोर्ट' तयार करण्यात विद्यापीठ अपयशी ठरले. "नॅक' मूल्यांकन केले नसल्यास विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग आणि "रूसा'कडून मिळणाऱ्या निधी थांबविण्यात येणार आहे. तसे स्पष्ट आदेश असतानाही नागपूर विद्यापीठाने याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाचा नॅक दर्जा घसरणार अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.

 

अधिक माहितीसाठी - अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

 

आता एप्रिल महिन्यात पाठवणार

विद्यापीठाला डिसेंबर महिन्यात सेल्फ स्टडी रिपोर्ट नॅककडे पाठवायचा होता. मात्र, आता हा कालावधीही निघून गेला असल्याने एप्रिल महिन्यात दर्जा संपल्यावर मिळणाऱ्या तीन महिन्यांच्या कालावधीत हा अहवाल नॅककडे सादर करणार असल्याचे समजते.

 

असे का घडले? - लिंक फॉलो केली अन्‌ लागला दीड लाखाचा चूना

 

आयक्‍युएसीच्या कार्यप्रणालीवर संशय

"नॅक' अहवाल तयार करण्याची जबाबदारी पूर्णत: "इंटरनल क्वॉलिटी एशुरन्स सेल'वर (आयक्‍युएसी) आहे. आतापर्यंत विभागाकडून त्यांना माहिती मिळविता आली नसल्यानेच अहवाल तयार झाला नसल्याचे समजते. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच इतका कालावधी निघून गेल्यावरही नॅकसाठी अहवाल तयार होत नसल्यास आयक्‍युएससीच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The university did not send the report