
दरवर्षी आठ लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या वसंत भवनावर तब्बल वीस लाख रुपये खर्च होत आहे. गुरुवारी (ता. 29) वित्त समितीच्या बैठकीत वसंत भवनावरील खर्चाचा मुद्दा चांगलाच चर्चेला आला.
चंद्रपूर ः जिल्हा परिषदेची उत्पन्नाची साधने फारशी नाहीत. थोडीफार आहे. मात्र, त्यावर खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेल्या वसंत भवनाची स्थिती काही वेगळी नाही. दरवर्षी आठ लाख रुपये उत्पन्न मिळणाऱ्या वसंत भवनावर तब्बल वीस लाख रुपये खर्च होत आहे. गुरुवारी (ता. 29) वित्त समितीच्या बैठकीत वसंत भवनावरील खर्चाचा मुद्दा चांगलाच चर्चेला आला.
जिल्हा परिषदेच्या वित्त समितीची सभा गुरुवारी ऑनलाइन पार पडली. अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे, राजेश कांबळे, राहुल संतोषवार, पृथ्वी अवताडे यांच्यासह वित्त विभाग, पंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे बजेट 60 कोटीवरून 30 कोटीवर आले. बजेट अर्ध्यावर आल्याचा फटका जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाला बसत आहे. अनेक योजनांना खीळ बसली. सध्या जिल्हा परिषदेकडे मोजकाच निधी आहे. उत्पन्नाचे स्त्र्रोत आहे. मात्र, त्याचे काहीच नियोजन जिल्हा परिषदेने आजवर केले नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा परिषदेच्या मालकीचे वसंत भवन आहे.
या भवनात सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी खोल्या आहेत. खाली सात ते आठ गाळे आहेत. या गाळ्यांचे भाडे अत्यल्प आहे. हे भाडे वाढविण्याबाबत आजवर जिल्हा परिषदेने कोणतेच प्रयत्न केले नाही. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणावरून मिळणाऱ्या मोठ्या उत्पन्नावर जिल्हा परिषदेला पाणी फेरावे लागत आहे. सध्या जिल्हा परिषदेकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे वसंत भवनातून उत्पन्नाचे साधन वाढू शकते. त्यावर विचार व्हावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी केली.
वसंत भवनाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख 37 हजार 437 रुपये आहे. त्यावर खर्च 20 लाख 3 हजार 581 रुपये आहे. बाजारभावानुसार याचे भाडे वाढविण्याची गरज असल्याचेही गजपुरे यांनी सभेत सांगितले. नागभीड तालुक्याला जनसुविधेचा 39 लाखांचा निधी प्राप्त झाला होता. कामे झाली असतानाही हा निधी परत गेला. त्यामुळे हा निधी परत द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
मोक्याच्या जागा धूळखात
शहरात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या काही जागा आहे. त्यात आरटीओ कार्यालयासमोर जागा आहे. जेटपुरागेट परिसरात जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यानंतर ज्युबिली हायस्कूलच्या परिसर मोठा आहे. या सर्व जागांचा उपयोग करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविता येऊ शकते. मात्र, त्याकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष होत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ