Video : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, धानाला प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

राज्यात आजपासून दहा रुपयात भोजन देणारी शिव भोजन योजना शासनाने सुरू केली आहे. सुरुवातीला जिल्ह्याच्या मुख्यालयी ही योजना राबविण्यात येणार आहे. क्रमाक्रमाने या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. या योजनेचा गोरगरीब जनतेला निश्‍चित लाभ होईल.

भंडारा : भात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी शासन भात शेती मीशन राबविणार आहे. यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने धानाला प्रति क्विंटल सातशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिली. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य ध्वजारोहण सभारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड उपस्थित होते. 

महत्त्वाची बातमी - निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, बलात्कार केल्यानंतर गुप्तांगात टाकला रॉड

भारतीय संविधानातील मूलतत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्य स्वतंत्र्य भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारे आहेत. शालेय वयातील मुलांच्या संस्कारक्षम मनात याची रुजवणूक यावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये परिपाठाच्या वेळी दररोज संविधान उद्देशिका समूह वाचनाचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात आजपासून सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले. 

राज्यात आजपासून दहा रुपयात भोजन देणारी शिव भोजन योजना शासनाने सुरू केली आहे. सुरुवातीला जिल्ह्याच्या मुख्यालयी ही योजना राबविण्यात येणार आहे. क्रमाक्रमाने या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. या योजनेचा गोरगरीब जनतेला निश्‍चित लाभ होईल. जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील 34 हजार 922 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. कर्जमुक्ती योजनेत आपला आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणसांच्या तसेच राज्याच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय, शेती व सिंचन अशा विविध कल्याणकारी योजना शासनाने हाती घेतल्या आहेत. भंडारा जिल्ह्यच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी दिली.

अवश्य वाचा - वाघ होता छाताडावर; तरीही हारली नाही हिंमत...अंगावर शहारे आणणारी ही बातमी वाचाच

माहिती संकेतस्थळावर अपलोड

जिल्ह्यात खरीप हंगाम 2019-20 मध्ये एक लाख 61 हजार 343 शेतकऱ्यांनी 74 हजार 881 हेक्‍टर क्षेत्रासाठी पीक विमा योजनेअंतर्गत विमा काढला होता. विमा काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 67 कोटी 86 लाखाचा विमा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील एक लाख 93 हजार 656 पात्र लाभार्थ्यांपैकी एक लाख 73 हजार 517 लाभार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. पात्र सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. 

विविध विषयांवर चित्ररथ

पोलिस दल, गृहरक्षक दल, एनसीसी पथक व विद्यार्थ्यांनी परेड संचलन करून मानवंदना दिली. पोलिस विभाग, रेशीम कार्यालय, पाणीपुरवठा व स्वच्छता, हेल्मेट सक्ती या विषयावर चित्ररथ काढण्यात आले. यावेळी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संचालन स्मिता गालफाडे व मुकुंद ठवकर यांनी केले. 

बालमृत्यू, कुपोषण यावर लक्ष केंद्रित करणार : ठाकूर

अमरावती : आजचा दिवस माझ्यासाठी फार मोठा आहे. 1980 साली मी सुद्धा एनसीसीमध्ये असताना याच मैदानावर तिरंग्याला मानवंदना दिली होती. येत्या काळात मेळघाटमधील बालमृत्यू, कुपोषण यावर आपण लक्ष केंद्रित करणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. अमरावती शहरातील जिल्हा स्टेडियम येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यानंतर ठाकूर यांच्या हस्ते जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचा प्रमाणपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vishwajeet kadam says, Rice Announces a grant of rs seven hundred