esakal | राज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर 
sakal

बोलून बातमी शोधा

वर्धा : स्थलांतरणाच्या मार्गावर असलेले वर्धा येथील बालसुधारगृहाची इमारत.

बालगुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेल्या अल्पवयीन मुलांच्या हातून पुन्हा तशी चूक होऊ नये, यासाठी त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली जाते. पण, राज्यात केवळ 11 जिल्ह्यांत 12 शासकीय बालसुधारगृहे आहेत. राज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर असल्याचे चित्र आहे.

राज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर 

sakal_logo
By
मनोज रायपुरे

 वर्धा  :  बालसुधारगृहात मुलांना समुपदेशन आणि स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण, राज्यात केवळ 11 जिल्ह्यांत 12 शासकीय बालसुधारगृहे आहेत. शासनमान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची 22 जिल्ह्यांत मुलामुलींची तब्बल 41 बालसुधारगृहे आहेत.  राज्यातील बालसुधारगृहांची धुरा स्वयंसेवी संस्थांवर असल्याचे चित्र आहे.

वाढत्या बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता शासकीय यंत्रणेने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय बालगृहांची निर्मिती करणे गरजेचे आहे. 
बालवयात हाती पाटी-पेन्सिल असण्याऐवजी चाकू यावा एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झाली आहे.

पालकांकडे मुलांना द्यायला वेळ नाही. पालक-मुलांमध्ये कमी झालेला संवाद यामुळे बालकांच्या हातून गुन्हे घडत आहेत. बालकांच्या हातून चोरी, अत्याचार, खून, मारहाण आदी गुन्हे घडत आहेत. वयाच्या 18 वर्षांखालील आरोपींना विधिसंघर्षग्रस्त बालके म्हटले जाते.

मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा

मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष न्यायालय आहे. त्यांना पालकांच्या देखरेखीखाली किंवा बालसुधारगृहात पाठवले जाते. या ठिकाणी मुलांची मानसिकता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांनी भविष्यात स्वत:चा रोजगार सुरू करावा, यासाठी विविध वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अशा अल्पवयीन मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. 

शासकीय बालसुधारगृह 

अमरावती येथे दोन तर नागपूर, वर्धा, गडचिरोली, बुलडाणा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, बीड, जालना, सिंधुदर्ग येथे प्रत्येकी एक बालसुधारगृह आहे. 

स्वयंसेवी संघटनांची बालगृहे 

राज्यात शासन मान्यताप्रात, पण स्वयंसेवी संस्था चालवीत असलेली मुलामुलींची तब्बल 41 बालसुधारगृहे आहेत. यामध्ये ठाणे (दोन), रायगड (एक), रत्नागिरी (दोन), पुणे (एक), सातारा (तीन), सांगली (दोन), सोलापूर (चार), कोल्हापूर (तीन), नाशिक (चार), धुळे (दोन), नंदुरबार (एक), जळगाव (दोन), अहमदनगर (चार), वाशीम (एक), औरंगाबाद (एक), भंडारा (एक), हिंगोली (एक), बीड (एक), उस्मानाबाद (एक), नांदेड (एक), लातूर (दोन) आणि परभणी (एक).

हे वाचलंय काय? : सावधान..! तुमचा पासवर्ड गाडी, मोबाइलचा नंबर तर नाही ना...
 

वर्धा येथील बालसुधारगृह गोंदियात
वर्धा येथे गत अनेक वर्षांपासून शासकीय बालसुधारगृह आहे; पण नुकतेच येथील बालसुधारगृह गोंदिया येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे महिला आयुक्‍तालय पुणे येथून पत्र मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बालगुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना समुपदेशन करण्यासाठी गोंदियाला नेताना त्रास होणार आहे. सध्या येथील बालसुधारगृहात तीन मुले आहेत. 
- माधुरी भोयर, बालसंरक्षण अधिकारी, वर्धा. 

loading image