गुन्हेगारांनो सावधान! आता पोलिसांचा असणार तुमच्यावर 'वॉच'; पोलिस महासंचालकांची माहिती 

अनिल कांबळे 
Sunday, 24 January 2021

तडीपार गुंड सर्वाधिक गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे दिसून येते. हे आरोपी सध्या कुठे आहेत,तडीपारी संपलेले सध्या काय करीत आहेत याची झाडाझडती घेण्याचे निर्देश पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहे. तडीपार व तीनपेक्षा अधिक शारीरिक दुखापतीचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडांची यादी तयार करण्यात येत आहे.

नागपूर ः गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना साकारण्यात येणार असून त्याचा श्रीगणेशा झालेला आहे. राज्यातील प्रत्येक गुन्हेगाराची यादी तयार करून त्यांच्यावर ‘ वॉच’ ठेवण्यात येणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई केली जात असून याचे परिणाम येत्या महिन्याभरात दिसतील, असे राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

तडीपार गुंड सर्वाधिक गुन्हेगारीत सक्रिय असल्याचे दिसून येते. हे आरोपी सध्या कुठे आहेत,तडीपारी संपलेले सध्या काय करीत आहेत याची झाडाझडती घेण्याचे निर्देश पोलिस उपायुक्तांना देण्यात आले आहे. तडीपार व तीनपेक्षा अधिक शारीरिक दुखापतीचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडांची यादी तयार करण्यात येत आहे. 

हेही वाचा - डॉ. होमी जहॉंगीर भाभा पुण्यतिथी विशेष: भारताचे ‘लिओनार्दो दा विंची‘ बैठकीसाठी आले...

वारंवार गुन्हे करणाऱ्या गुंड व त्यांच्या टोळींविरूद्ध, स्थानबद्ध, मकोका व महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. अशा गुंडांच्या प्रत्येक दिवसाची हालचालींची माहिती घेण्याचे ‘टार्गेट’ पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त दर आठवड्याला या गुंडांबाबत इत्थंभूत माहिती घेऊन त्याचा अहवाल दर महिन्याला पोलिस आयुक्तांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सादर करतील, असे नगराळे म्हणाले.

पाच मिनी फॉरेंसिक लॅब

फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाला वेळ लागतो. त्यामुळे पाच मिनी लॅब वाढविण्यात आल्या आहेत. साक्षीदार व तक्रारदार फितूर होत असल्याने शिक्षेचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी साक्षीदार व तक्रारदार फितूर होऊ नये याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावाच्याही भक्कम आधार घेतला जाईल.

हेही वाचा - अखेर छडा लागला! पत्नीच्या प्रेमसंबंधास पतीचा होता विरोध; प्रियकराच्या मदतीने काढला काटा 

रिक्त जागा पदोन्नतीने भरणार

राज्यात दोन लाखांपेक्षा अधिक पोलिस अधिकारी व अमलदारांची पदे आहेत. त्यापैकी सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांवर अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना विनंती करणार आहोत. नागपुरात रिक्त असलेले पोलिस सहआयुक्त, व सहाय्यक पोलिस आयुक्तपदी लवकरच अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असेही नगराळे यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Make Maharashtra to No crime state said Director General of Police