पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सासूची जावयाने केली हत्या

संतोष ताकपिरे
Saturday, 28 November 2020

शुक्रवारी (ता. 27) रात्री दहाच्या सुमारास अमीतने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अमीतने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. जावयाची समजूत काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांनी धाव घेतली असता, त्यांनाही धक्काबुक्की केली.

अमरावती : पतीपत्नीमध्ये सुरू असलेले भांडण मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूवर जावयाने रॉडनी हल्ला केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला असून  कलावती जगनराम मसराम (वय 57, रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी-2) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 27) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. राजापेठ पोलिसांनी तत्परतेने कारवाई करून संशयित आरोपी अमित किशोर सडमाके (वय 32, मुळ रा. अचलपूर) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून घटनेनंतर तासाभरात त्याला अटक केली. 

हेही वाचा - चांदूर बाजार नगरपालिकेची पोटनिवडणूक, भाजपचा पराभव करत पालिकेवर प्रहारचा झेंडा

अमित लग्नानंतर बऱ्याच वर्षापासून राजापेठ हद्दीतील  वसंतराव नाईक झोपडपट्टी क्रमांक 2 येथे सासूच्या घराशेजारीच राहतो. पत्नी दीपाली सडमाके (वय 28) ही मोलमजूरी करते. तर, अमीत काहीच काम करीत नव्हता. शिवाय व्यसनाच्या आहारी गेला. नेहमी पत्नी दिपालीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत वाद घालीत असे. शुक्रवारी (ता. 27) रात्री दहाच्या सुमारास अमीतने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अमीतने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. जावयाची समजूत काढण्यासाठी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांनी धाव घेतली असता, त्यांनाही धक्काबुक्की केली.

हेही वाचा - महाविकास आघाडी हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार -...

एवढ्यात अमीत याची सासू कलावती याही तेथे आल्या असता, त्यांना शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून रॉडनी डोक्‍यावर प्रहार केला. त्यात कलावती मसराम या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान कलावती यांचा मृत्यू झाला, असे पोलिस उपनिरीक्षक मंठाळे यांनी सांगितले. झटापटीत अमीतची पत्नी दीपाली सडमाके, दिपालीची मोठी बहीण प्रिती महेश तोडासाम (वय 34), महेश तोडासाम (वय 40) हे सुद्धा किरकोळ जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. राजापेठ पोलिसांनी प्रीती तोडासाम यांच्या तक्रारीवरून अमीत सडमाके विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 

अमित नेहमीच घरी पत्नीसह सासूसोबत वाद घालीत होता. हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संशयित आरोपी अमीतला अटक केली. 
- किशोर सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman murdered in slum area of amravati