Video : निडर महिलांचा थेट ठाणेदारांसोबत पंगा

Women's movement against illegal occupations
Women's movement against illegal occupations

मंगरुळ चव्हाळा (जि. अमरावती) : त्या साध्यासुध्या महिला आहेत. कुणाकडेही कोणतेही मोठे पद नाही. अगदीच गावच्या सामान्य नागरिक. परंतु, त्यांनी थेट पोलिस निरीक्षकांसोबत पंगा घेतला आहे. तो कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी नव्हे, तर गावाच्या भल्यासाठी. या निडर महिलाची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. 
मंगरुळ चव्हाळा हे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील एक गाव. या महिला या गावातीलच आहेत. का घ्यावासा वाटला त्यांना पंगा? हे शोधण्यासाठी "टीम सकाळ'ने थेट गाव गाठले. तर त्या महिला चक्क पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या दिसल्या. त्याही एका नालीच्या रपट्यावर. त्यांना विचारले, "कशासाठी उपोषण?' तर मग त्यांनी बंद बाटलीचा बूच उघडावा, तसे सर्वच उघड केले. 

""गेल्या दोन ऑक्‍टोबर रोजी 172 नागरिकांच्या स्वाक्षरीचे एक निवेदन आम्ही ठाणेदारांना दिले. त्या निवेदनात एक विनंतीही केली होती आणि इशाराही दिला होता. ठाणेदार साहेब, आमच्या गावात डझनभराहून जास्त अवैध दारू विक्री-केंद्रे आहेत. अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक सर्रास दारू विकतात. यात हातभट्टी, देशी, विदेशी आणि गावरान अशी सर्वच प्रकारची दारू असते. तुम्ही हे अवैध दारूधंदे तत्काळ बंद करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू. परंतु या ठाणेदारांनी काहीच केले नाही. यांचे सर्व सेटिंग आहे साहेब. या भट्ट्यावाल्यांकडून हप्ते घेतात हे पोलिस. आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितले.'' 

"तुमच्याकडे काही प्रूफ आहेत का', असे विचारल्यावर ""आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दाखवूही शकतो. पण आमचे निवेदन दिल्यानंतरही एकही अवैध धंदा बंद झाला नाही. त्यावरून आम्ही काय समजावे'', असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावर ठाणेदार आणि पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे यांची त्यांच्या चेंबरमध्ये भेट घेतली. ""आम्ही छापे टाकले आहेत. आम्ही सक्त कारवाई केली आहे'', असे वायंदडे सरांनी सांगितले. त्यावर पुन्हा महिलांची प्रतिक्रिया घेतली. त्यावर महिलांचे समाधान झाले नाही. त्या म्हणाल्या, ""कारवाई केली तर मग अवैध धंदे सुरू कसे? आम्हाला डोळ्याने दिसते. पोलिसांना का नाही? आम्ही दुकानांची सूचना दिली, तर यांच्याच पोलिस स्टेशनमधून विक्रेत्याला निरोप दिला जातो. मग दाखविण्यासाठी कारवाई केली जाते.'' 

पोलिस कारवाई करणार का?

"टीम सकाळ'ने उपोषण करणाऱ्या महिलांची मते, पोलिस निरीक्षक सुनील वायंदडे यांच्या प्रतिक्रियांचे "लाइव्ह स्ट्रिमिंग' केले. तसेच पुढाकार घेत महिला आणि वायंदडे यांचा आपसांत थेट संवादही घडवून आणला. "टीम सकाळ'पुढे महिलांना वायदंडे यांनी आश्वासन दिले. ""जे अवैध धंदे आम्हाला माहीत असतात, त्यावर आम्ही कारवाई करतो. परंतु ज्याची आम्हाला कल्पना नाही, त्याचे ठिकाण तुम्ही दाखवा. त्यानंतर मी कारवाई केली नाही, तर मग मला जबाबदार ठरवा.'' वायदंडे यांच्या या आश्‍वासनानंतरही महिला समाधानी नव्हत्या. त्या म्हणाल्या, ""आम्हाला लेखी आश्वासन मिळणार नाही, तोवर आम्ही उपोषण सुरूच ठेवू.'' पोलिसांसोबत निडर महिलांनी घेतलेल्या या पंग्यानंतर पोलिस काय कारवाई करतात? अवैध धंदे बंद करतात का? यावर "सकाळ' लक्ष ठेवून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com