खर्रा खाऊन शपथ घेणार्‍यास एक हजार रुपयाचा दंड

अरुण डोंगशनवार
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

'न्यायालयीन परिसरात आलेले अनेक जण न्यायालयाच्या भिंतीवर, पायर्‍यांवर वा इकडेतिकडे खर्रा खाऊन थुंकतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. आरोग्यास धोका निर्माण होतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाप्रमाणे सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्यामुळे अस्वच्छता करणार्‍या लोकांना शासन होऊन अस्वच्छतेला पायबंद व्हावा, यासाठी हा निर्णय योग्य आहे. या निर्णयाचे वकिलांकडून स्वागत करण्यात आले आहे.'
-अ‍ॅड. गजानन खैरकार, वकील संघाचे माजी अध्यक्ष, पांढरकवडा.

पांढरकवडा येथील न्यायाधीशांनी ठोठावली शिक्षा

पांढरकवडा (यवतमाळ) : न्यायालयात साक्ष देताना तोंडात खर्रा असल्याने शपथ घेता आली नाही. परिणामी न्यायालयाच्या कामकाजात बाधा उत्पन्न झाली. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक आर. एन. जोशी यांनी साक्षिदारास एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या निकालामुळे खर्रा खाऊन न्यायालयीन परिसरात अस्वच्छता करणार्‍यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

वणी तालुक्यातील राजूर कॉलनी येथील राजनसिंग सूजरपाल कोठारे (वय 37) हे वेस्टर्न कोल्डफिल्ड लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मध्ये नोकरीला आहेत. त्याची शुक्रवारी (ता. 22) एक वाजून 20 मिनिटांनी न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या न्यायालयात साक्ष होती. अ‍ॅड. एस. व्ही. सितारे हे त्यांची उलटतपासणी करीत होते. त्यावेळी शपथ घेत असताना राजनसिंग यांच्या तोंडात खर्रा असल्याने ते योग्य पद्धतीने शपथ घेऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना दुसर्‍यांदा शपथ घेण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी न्यायाधीशांना तोंडात खर्रा असल्याची कबुली दिली. यामुळे न्यायालयाच्या कामकाजात व्यत्यय आला आणि विलंब झाला. तसेच न्यायालयाची अवमानना झाली. त्यामुळे भादंवि 228 नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस न्यायालयाने राजनसिंग यांना बजावली. त्यावर राजनसिंग यांनी कबुली दिल्याने त्यांना एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा जिल्हा न्यायाधीश आर. एन. जोशी यांनी ठोठावली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: yavatmal news court One thousand rupees penalty