गुरुजी शाळेतच झाले "टाईट", विद्यार्थ्यांना म्हणाले चला मैदानात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

चंद्रपुरातील दारूबंदी किती फसवी आहे, याचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना यानिमित्ताने समोर आली. गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत भंगाराम तळोधीजवळच भंगारपेठ जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत 27 विद्यार्थी आहे. त्यांच्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : दोन शिक्षकी जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक सुटीवर गेले. दुसऱ्याकडे शाळेची जबाबदारी आली. त्याने शाळेत येतानाच दारू रिचवली. त्याला चांगलीच झिंग चढली. दारू उतरविण्यासाठी खेळाचे निमित्त केले. 27 विद्यार्थ्यांसह मैदानात उतरला. मात्र, अपेक्षप्रमाणे त्याचा तोल गेलाच. तळीराम मास्तराला सांभाळताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ आले. गावकऱ्यांपर्यंत गोष्ट गेली आणि शाळेला मधुशाला बनविणाऱ्या मास्तराला थेट ठाण्यात पोचविण्यात आले.

चंद्रपुरातील दारूबंदी किती फसवी आहे, याचा प्रत्यय देणारी आणखी एक घटना यानिमित्ताने समोर आली. गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत भंगाराम तळोधीजवळच भंगारपेठ जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत 27 विद्यार्थी आहे. त्यांच्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गुरुवारी शाळेतील एक शिक्षक रजेवर होता. त्यामुळे एकाच शिक्षकावर शाळेची जबाबदारी आली. शाळा सुरू झाली.

- डायलिसिसवर जगतोय साहेब, उपचार करा, अन्यथा विषतरी द्या

विद्यार्थीही शाळेत आले. पुस्तक वाचन करून विद्यार्थ्यांनी शाळेची सुरवात केली. दुसरीकडे शिक्षकानेही मद्यप्राशन करून शाळेला मधुशाला बनविले. बरीच दारू ढोसल्यानंतर जरा जास्तच झाली याची जाणीव त्याला झाली. त्याला चांगलीच झिंग चढली. दारू उतरविण्यासाठी त्याने नामी शक्कल लढविली. शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सांगितले. तोही खेळात सहभागी झाला. पण झाले उलटच. दारूच्या अतिसेवनाने त्याचा तोल ढासळला आणि तिथेच तो लोटला.

- वर्धा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या माहिती आहे का?
 

"भंगार"पेठच्या तळीराम मास्तराची "मधू"शाला
विद्यार्थीही घाबरले. खेळ सोडून ते मास्तराला सांभाळण्याच्या भानगडीत पडले. इकडे गावात या प्रकाराची माहिती झाली. गावकऱ्यांनी पोलिस ठाण्यात फोन लावला. पोलिसांचे वाहन शाळेत आले. शाळा व्यवस्थापन समितीची चमूही घटनास्थळी दाखल झाली.मग काय त्या शिक्षकाची रवानगी थेट ठाण्यात झाली. वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

याप्रकरणी अद्यापही पोलिसांनी कारवाई केले नाही. चंद्रपूरच्या दारूबंदीला चार वर्ष पूर्ण झालीत. पण ती पुरतीच फसवी ठरली आहे. दारूऐवजी लहानलहान बालक ड्रगच्या आहारी जात आहेत. शाळेला मधुशाला बनविण्याच्या या शिक्षकाच्या प्रतापाबाबत आता प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: z p teacher reached school drunken