तुकोबांच्या पालखी मार्गावर शेकडो झाडांची कत्तल

मनोज गायकवाड
Tuesday, 27 June 2017

अकलूज: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ।। येणे सुखे रूचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ।। या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संतवचनाचा हा दाखला देत "सकाळ' तसेच शासनसुद्धा हरित वारी हा उपक्रम राबवीत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला विजेच्या तारांना अडथळा येत असल्याचे सांगून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे.

संत तुकाराम महाराजांची पालखी गुरुवारी जिल्ह्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यांचा परिसर स्वच्छ केला जात आहे. झाडांच्या बुंध्यांना चुना आणि काव रंगाचे पट्टे मारले जात आहेत. त्याचवेळी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोठ्या झाडांची कत्तलही केली जात आहे. सराटीकडून येणाऱ्या पालखी मार्गावर झाडांच्या कत्तलीचे हे विदारक चित्र पाहताना अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आघाडी सरकारच्या काळात अतिशय नियोजनपूर्वक या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला. वृक्षलागवड आणि संगोपन यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच चांगला निधीही उपलब्ध करून दिला. त्यामुळे सराटीपासूनचा पालखी मार्ग, अकलूजमधील बायपास रोड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली. दहा-बारा वर्षांच्या प्रयत्नानंतर ही झाडे आता मोठी झाली आहेत. त्यामुळे अकलूजमध्ये वृक्षाच्छादीत हरित रस्ते दिसत आहेत. गावच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे रस्त्यांवर प्रसन्नतेचा अनुभव येत आहे. रस्त्यांच्या दुतर्फा डेरेदार झालेल्या या झाडांच्या माथ्यावरूनच वीजवाहक तारा गेल्या आहेत. या तारांना अडसर ठरू नये. पालखी काळात त्यातून कोणताही अनर्थ होऊ नये. हे कारण सांगून ही झाडे अर्ध्यातून तोडली जात आहेत. अर्धवट तोडलेल्या झाडांच्या बुध्यांना पुन्हा पालवी फुटणार असली तरी या झाडांच्या वाढीचा वेग मंदावत आहे. काही झाडे जळून जात आहेत.

एकीकडे शासनाचा वनविभाग राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट घेऊन कामाला लागला आहे. त्या अंतर्गत 1 जुलैला राज्यात चार कोटी झाडे लावली जाणार आहेत. शासनाच्या वतीने हरित वारीचा जागर केला जात आहे, तर दुसरीकडे पालखी मार्गावर वाढविलेली झाडे तोडली जात आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017 tree cuting in palkhi way