ऑन डिफरंट ट्रॅक : ‘पिच्यांक सिलॅट’ मधील भारतीय नारीशक्ती

शिल्पा परांडेकर
Saturday, 9 May 2020

वडील मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षक असल्यामुळे लहानपणापासुनच त्यांच्या कडक शिस्तीत कराटे व बॉक्सिंग यांचे प्रशिक्षण सुरू झाले. अभिनेता अक्षयकुमार आयोजित स्पर्धेत त्याच्याच हस्ते बक्षीस मिळाले. यामुळे माझा व माझ्या वडिलांचा याच क्षेत्रात करिअर करण्याबाबत आत्मविश्वास दुणावला. दरम्यान इंटरनेटवरून ‘पिच्यांक सिलॅट’ या खेळाची माहिती मिळाली व त्या दिशेने प्रवास सुरू झाला. 
- मृणाल कांबळे

नाव : मृणाल नितीन कांबळे 
वय : २० वर्षे
गाव : कोल्हापूर 

एक कडक शिस्तीचे मध्यमवर्गीय वडील. पहाटे धावण्याचा व खेळाचा सराव. दिवसातून किमान चार तास सराव आवश्यक, असा शिरस्ता. सरावासाठी अपुरे साहित्य, तरी स्वतःला व मुलींनाही कधी निराश होऊ न देणारे. पुढे मोठ्या मुलीने तिच्या खेळात अनेक सुवर्णपदके जिंकली. आणि दुसरी कन्याही आता याच मार्गावरून चालतेय. काय म्हणालात? मी ‘दंगल’ चित्रपटाचे कथानक सांगतेय? नक्कीच नाही. मात्र, एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असेच हे कथानक आहे, कोल्हापुरातील कसबा बावडयाचे. 

मृणाल कांबळे असे तिचे नाव. ‘पिच्यांक सिलॅट चॅम्पिअन’. ‘पिच्यांक सिलॅट’ ही इंडोनेशियातील एक प्राचीन युद्धकला. इतर मार्शल आर्ट्स प्रकारातीलच, परंतु थोड्या वेगळ्या तांत्रिक कौशल्यांनी खेळला जाणारा एक खेळ. मात्र, खेळाच्या सरावासाठी लागणारी साधनसामग्री, प्रथिनयुक्त आहार अशा गोष्टींची वानवा होती.  तरीही जिद्दीने सराव सुरू ठेवला. याचेच चांगले फलश्रुत म्हणजे २०१८मध्ये ७०० खेळाडूंचा समावेश असलेल्या ‘एशियन गेम’च्या निवड चाचणीसाठी जाण्याची संधी मृणालला मिळाली. यात महाराष्ट्रातून तिच्यासह दोनच खेळाडू होते, तर कोल्हापुरातून ती एकमेव होती. या निवडीपूर्वी इंडोनेशिया सरकार व ‘स्पोर्ट्स ॲथारिटी ऑफ इंडिया’तर्फे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांकडून खेळ व आहाराबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची संधी तिला मिळाली. 

यशाची चढती कमान... 
आजवर सलग सहा वेळा सिनियर राज्यस्तरीय स्पर्धांत, तर नॅशनल स्पर्धेत सलग पाच वेळा तिने सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच ‘एशियन चॅम्पिअनशिप’मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करताना चौथे स्थान, तर सिंगापूर येथील जागतिक स्पर्धेत तिने सातवे स्थान पटकावले. याचसोबत अनेक मानसन्मानही तिने मिळवले आहेत. स्वसंरक्षणासोबतच ‘पिच्यांक सिलॅट’सारख्या नवीन क्षेत्रात मुलींनी करिअर करायला हवे, यासाठी दोघे पिता-पुत्री आग्रही व प्रयत्नशील आहेत. मृणालसोबतच तिची बहीण व इतर विद्यार्थिनी आगामी ‘एशियन गेमस्’ व ऑलिंपिकमध्ये या खेळातून भारताला पदक मिळवून देण्यासाठी तयारी करीत आहेत. असे आग्रही पिता-पुत्री प्रत्येक समाजात व क्षेत्रात असतील, तर मुलींना कोणतेच क्षेत्र वर्ज्य नाही. हो ना?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shilpa parandekar on Mrunal Kamble