स्वातंत्र्याचा असाही विचार करू या! 

हर्षदा स्वकुळ 
Friday, 8 January 2021

‘ती’च्यासाठी तो एक ‘वेगळा मित्र’ कॅटेगरीत गेला, ‘ती’च्यासाठी त्याची आई म्हणजे, मोकळ्या वाळवंटात पाणी मिळवून दिलेली घट्ट मैत्रीण झाली. आणि त्याच्या आईसाठी ती म्हणजे... 

त्याचं-तिचं नातं घट्ट होतं; पण वेगळं होतं. ‘त्याला’ ‘ती’नं शॉर्ट स्कर्ट घातलेले नको होते. ‘ती’ला त्यात वावगं वाटत नव्हतं. त्याला ‘ती’नं कॉलेजमध्ये त्याच्याबरोबरच राहावं वाटायचं, ‘ती’ मित्रांच्या गराड्यात असायची. त्याला ‘ती’नं आपल्याकडे कपडे, दागिने, गाडीची मागणी करावी असं वाटायचं, ‘ती’ त्याच्याशी सिग्मन फ्रॉईडच्या सेक्शुआलिटीच्या थिअरीवरही बोलण्यास तयार असायची. ‘तुझं फक्त मुलांशीच पटतं’ ही ‘त्या’ची तक्रार, तर ‘मुलींकडे विषयच नसतात’ ही ‘ती’ची तक्रार.. 

घरी खांद्यावर कायम पदर असलेल्या आईसमोर हिला कशी आणू? या सततच्या विवंचनेत ‘तो’, आणि तिला ‘तो’ किती स्वातंत्र्य देतो या आनंदात ‘ती’च्या घरचे. अवेळी बाहेर जाऊ देतोय, ध्येय- ध्येय असं काय कप्पाळ असतं?, नोकरी करून देतोय, हवे तसे कपडे घालून देतोय, आयुष्यात मित्र ठेवून देतोय, मग वाईट काय आहे?... या घरच्यांच्या प्रश्नासमोर ‘ती’ हताश व्हायची. 

हेही वाचा : फोकस ठरवा आणि टाका पुढचं पाऊल

मग एक दिवस ‘ती’ ‘त्या’च्या आईसमोरच जाऊन बसली. मनातली ही घालमेल त्यांना सांगितली... आणि अनपेक्षितपणे त्याच्या आईनं फ्रॉईड, शेक्सपिअर, मार्क्स, चे गव्हेरा, फिडेल कॅस्ट्रोवर बोलायला सुरुवात केल्यावर ती अवाक् झाली. खांद्यावरचा पदरही न हलवता उठून आत जाणाऱ्या ‘त्यांना’ बघून ‘ती’ला ‘त्या’च्या मर्यादा कळाल्या. या मर्यादांना स्वीकारून पुढे जाणं ‘ती’ला शक्य नव्हतं. आर्थिक मर्यादा एकवेळ परवडणाऱ्या होत्या; पण इंटलॅक्चुअल मर्यादा ‘ती’ला अस्वस्थ करणाऱ्या होत्या. 

हेअर कलरिंग, फाउंडेशन ते नखांची अशी घ्या काळजी

त्या क्षणी नात्यांचा गुंता झपझप सुटला. त्या क्षणापासून ‘ती’ त्याच्यासाठी ‘अतिशहाणी’ कॅटेगरीत गेली, ‘ती’च्यासाठी तो एक ‘वेगळा मित्र’ कॅटेगरीत गेला, ‘ती’च्यासाठी त्याची आई म्हणजे, मोकळ्या वाळवंटात पाणी मिळवून दिलेली घट्ट मैत्रीण झाली. आणि त्याच्या आईसाठी ती म्हणजे... 

त्यांनी बोलूही नये; पण त्यांना पाठमोरं जाताना पाहून तीनं त्यांच्या मनातला अपेक्षित निर्णय ओळखावा, असं अव्यक्त नातं कळणारी प्रगल्भ मुलगी झाली...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harshada Swakul write article about thought of freedom

Tags
टॉपिकस
Topic Tags: