‘पॉवर’ पॉइंट : स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव

आपल्या कामाची तडफ, प्रेमात झोकून देण्याच्या हिंमतीवर रोजच प्रश्नचिन्ह उभं राहील असं काहीतरी घडतं
‘पॉवर’ पॉइंट
‘पॉवर’ पॉइंटsakal

‘‘अजून किती काळ रोज सकाळी उठून मला स्वत:ला सिद्ध करत राहावं लागणार आहे. मी नात्यात प्रामाणिक आहे, तरी रोज उठून ते सांगण्याची वेळ का येतीये? ऑफिसमध्ये माझ्याएवढा कामाचा झपाटा बाकी कुणाचाही नाही, तरी रोज पहिल्या पानापासून सुरुवात केल्यासारखं मी का स्वत:ला सिद्ध करत बसू?’’ ती माझ्यासमोर घडाघडा बोलत होती आणि मला तिला कोणत्या वाक्यानंतर थांबवू, याचा अंदाजच येत नव्हता.

आपल्या कामाची तडफ, प्रेमात झोकून देण्याच्या हिंमतीवर रोजच प्रश्नचिन्ह उभं राहील असं काहीतरी घडतं, आणि मग पुन्हा नात्यांत, कामांत मी कसं १०० टक्के प्रामाणिक आहे, तडफेची आहे, हे सांगत बसण्याची वेळ तिच्यावर येत होती. पण स्वत:वर अरेरे म्हणायची वेळ कधी आणायची नाही हे वाक्य मी कायम डोक्यात ठेवलंय. त्यामुळे रोजच्या रोज वही कोरी करण्याची तिची सवय मोडायला हवी असं मला मनापासून वाटलं

काही गोष्टी एकदाच कराव्यात, त्या सतत केल्यानं त्या गोष्टींची किंमत राहत नाही अशा मताची मी आहे. रोज स्वत:ला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत अडकण्याची काहीही गरज नसते. म्हणजे सोप्या उदाहरणांमुळे सांगू का. वर्षानुवर्ष आपण जिथे नोकरी करतो तिथे नवीन आलेल्या लोकांमुळे स्पर्धात्मक वातावरण तयार होण्याकडे तोपर्यंतच लक्ष द्यावं, जोपर्यंत ते वातावरण पोषक आहे. पण ‘मी कशी भारी’ हे दाखवण्याच्या नादात रोज उठून पहिल्या पानापासून सुरुवात करण्याची खरंचच काही आवश्यकता नसते. हे अदृश्य कुणीतरी लादलेलं प्रेशर मैत्रिणींनो घेऊ नका. आपल्या अनुभवांच्या झोळीवर थोडातरी विश्वास ठेवा. त्या अनुभवांनी समृद्ध झालाच असाल ना? मग रोज परत तेच अनुभवलं तरच ‘मी कशी अप-टू-डेट आहे,’ हे नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना कळेल, याचा अट्टाहास मुळीच नको.

‘पॉवर’ पॉइंट
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : सॉसेजेस : सर्वांत जुने इन्स्टंट फूड

जे नोकरीत तेच नात्यात. एका नात्यात अनेक वर्ष राहिल्यावर, नव्याचे नऊ दिवस संपल्यावर दोन व्यक्तींमधलं मौनही कम्फर्टेबल असतं. त्या मौनाचे हजार अर्थ काढत ‘माझं काही चुकलं असेल का?’ असा विचार करत, सतत आपली लॉयल्टी सिद्ध करण्याची गरजच नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्यासाठी काय काय करू शकते याची जाणीव समोरच्याला प्रत्येक वेळी का करून द्यायला हवी? काही नात्यांची गंमत अशी असते ना की, चार्म जाईल या भीतीनं हे नातं रोज खुसखशीत ठेवण्याचं एक वेगळंच बर्डन दोघांपैकी एक कुणीतरी घेतो. ते आनंदानं होत असेल तर ठीके; पण जर मी असं नाही केलं तर नात्याचं अमुक अमुक होईल हे गणित नात्यात येतं तेव्हा त्याचं पुढे रूपांतर रोज उठून स्वत:ला सिद्ध करण्यातच अनेकदा होतं.

‘पॉवर’ पॉइंट
सौंदर्यखणी : ‘श्रीकलाहस्ती’ कलमकारीची ‘गोष्ट’

मला इतकंच म्हणायचंय, की ज्यांचा आपण आदर करतो त्यांच्याकडून जर आपल्याला भरभरून प्रेमाची, आदराची अपेक्षा असेल, तर त्यांच्याशिवायही जगता येतं हे आधी स्वत:ला सिद्ध करा. म्हणजे मग रोज उठून आपला प्रामाणिकपणा, प्रेम, काळजी त्यांना सिद्ध करण्याची वेळ येणार नाही.

याच नोकरीत काय, अगदी याच्या बाहेरही मी बेस्टच काम करू शकेन, हे स्वत:ला सिद्ध करा. एखादी व्यक्ती बरोबर असली तर उत्तम; पण नसली तरी झोकून देऊन जीव लावणं माझ्या रक्तातच आहे, हे स्वत:ला सिद्ध करा. हा अतिआत्मविश्वास नाही, तर हे स्वत:वर मनापासून विश्वास ठेवणंय, स्वत:वर मनापासून प्रेम करणं आहे, स्वत:ला किंमत देणं आहे. रोज वही कोरी करू नका, त्याच वहीचं फक्त पुढचं पान उलटा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com