कचऱ्याचे अनोखे ‘अप-सायकलिंग’ 

कचऱ्याचे अनोखे ‘अप-सायकलिंग’ 

नाव – सोनाली फडके व धारा कबारिया 
शहर – पुणे 

‘पुणेरी लोक म्हणे नवीन कपडा अगदी जीर्ण होऊन फाटेपर्यंत त्याचा सर्वतोपरी वापर करतात. अगदी शेवटी उरलेल्या चिंधीचा निरांजनामध्ये वात म्हणून वापर होईपर्यंत,’ असा केविलवाणा विनोद काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवर फिरत होता. वस्तूंचा पुरेपूर वापर केवळ पुण्यातीलच नाही, तर आपल्या जुन्या पिढीतील सर्वच लोकांनी केला आहे. यालाच तर आपण ‘टाकाऊतून टिकाऊ’ म्हणतो. काटकसर, श्रमाचे मोल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कमीत कमी कचरानिर्मिती ही महत्त्वाची मूल्ये आपल्या दैनंदिन व्यवहाराचाच एक भाग होती, पण आजकालच्या आधुनिक जगात असा वस्तूंचा वापर क्वचितच होताना दिसतो. टाकाऊ वस्तूंचे करायचे काय, असा यक्षप्रश्न समाजापुढे आहे. शिवाय सर्वच वस्तूंचे ‘रि-सायकलिंग’ करता येत नाही. अशावेळी ‘अप-सायकलिंग’ म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून ‘वस्तूंची कलात्मक नवनिर्मिती करणे’ हा एक उत्तम पर्याय समोर येतो. अशा ‘अप-सायकलिंग’ वस्तूंनी सजलेले अनेक आकर्षक कॅफेज्, रेस्टॉरंटस् मी याआधी पाहिले आहेत. किंवा मग अशाच टाकाऊ भंगारातून सुश्राव्य ‘नादनिर्मिती’ करणाऱ्या तौफिकजींच्या ‘मुंबई स्टॅम्प’चे व्हिडीओ तर कित्येकदा ऐकले व पाहिले आहेत. मात्र, अशा कलात्मक निर्मितीची प्रक्रिया पुण्यातील आपल्या दोन मैत्रिणी सोनाली व धारा यांच्यामुळे जाणून घेता आली. 

धाराने ‘अल्टरनेट युज ऑफ मटेरियल’ या विषयातून पदव्युत्तर शिक्षण ब्रिटनमधून घेतले आहे, तर सोनालीने पुण्यातील ‘इकॉलॉजी सोसायटी’चा ‘सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे आपण याच क्षेत्रात काम करायचे, या निर्धाराने दहा वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या कामाचे आज मोठ्या व्यवसायात रूपांतर झाले आहे. 

त्या सांगतात, ‘‘सर्जनशील व कुशल कारागिरांच्या मदतीने आम्ही घरगुती व औद्योगिक भंगारातून चहाचा कप ठेवण्यासाठी वापरले जाणारे ‘कोस्टर्स’ ते राहण्यासाठी किंवा शाळांसाठी उपयुक्त असे ‘कंटेनर्स’ बनवितो. हे शिपिंग कंटेनर्स औद्योगिक वापरानंतर इतर वापरासाठी उपयुक्त असतात शिवाय इतर इमारतींच्या तुलनेत त्वरित उभारता येतात. ते स्वस्त, मजबूत, आकर्षक व पर्यावरणपूरक असतात. शिवाय ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन पुन्हा उभे करता येतात. ही आमची खासियत आहे.’’ मात्र कचऱ्याची वाहतूक व या निर्मितीसाठी लागणारे कुशल व सर्जनशील मनुष्यबळ मिळणे, ही खूप आव्हानात्मक गोष्ट असल्याचेही त्या स्पष्ट करतात. ‘कवडीमोल’ वाटणाऱ्या कचऱ्यावर किंवा भंगारावर अशा अ‍वलियांची जादूची कांडी फिरल्यावर कचराही ‘मौल्यवान’ वाटू लागतो, हे नक्की. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com