काश्मीरमध्ये तीन घुसखोर दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याने केला खात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

या वर्षात आतापर्यंत 38 सशस्त्र दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील बंदीपूर जिल्ह्यात घुसखोरीचा डाव उधळून लावत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

बंदीपूर जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेलगत घुसखोरी करू पाहणाऱ्या दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचालींची चाहूल लागताच भारतीय लष्कराने तात्काळ त्यांना आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 

तत्पूर्वी, रविवारी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील माचिल सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दहशतवाद्याला ठार करत लष्कराने त्यांचा डाव उधळून लावला होता. 
या वर्षामध्ये भारतीय सैन्याने प्रत्यक्ष जम्मू-काश्मीरमध्ये ताबारेषेलगत दहशतवाद्यांचे एकूण 22 वेळा घुसखोरीचे डाव उधळून लावले आहेत. या कारवायांमध्ये आतापर्यंत 38 सशस्त्र दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: