नितीश कुमारांचे 50 महिन्यांनंतर 'एनडीए'मध्ये कमबॅक!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

जेडीयू पक्षाने तब्बल 17 वर्षे एनडीएची साथ दिली. भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या नितीश कुमार यांनी एनडीए सोडायचा निर्णय घेतला आणि 16 जून 2013 रोजी तशी घोषणा केली होती. आता सुमारे 50 महिन्यांतच त्यांनी आपला निर्णय फिरवला आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी पक्ष नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार होते.

नितीश कुमार यांनी बिहारमधील काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपच्या पाठिंब्यावर नुकतेच सरकार स्थापन केले आहे. जेडीयू, काँग्रेस आणि आरजेडी पक्ष 2015 च्या बिहार निवडणुकीसाठी एकत्र आले होते.

जेडीयू पक्षाने तब्बल 17 वर्षे एनडीएची साथ दिली. भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या नितीश कुमार यांनी एनडीए सोडायचा निर्णय घेतला आणि 16 जून 2013 रोजी तशी घोषणा केली होती. आता सुमारे 50 महिन्यांतच त्यांनी आपला निर्णय फिरवला आहे.

आज नितीश कुमार यांच्या निवासस्थानी कार्यकारिणीची बैठक झाली. बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. जेडीयूचे नेते शरद यादव यांचे आणि आरजेडी पक्षाचे समर्थक हातात निषेधाचे फलक घेऊन नितीश यांच्या निवासस्थानाबाहेर उभे होते. त्यांनी नितीश यांच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या.

बैठकीपूर्वीच पक्षाचे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी एनडीएमध्ये विलिन होण्याचा निर्णय जाहीर केला होता. 'भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जेडीयूला एनडीएमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाचा स्विकार बैठकीत केला जाईल,' असे त्यांनी घोषित केले होते.

शरद यादव यांना हा निर्णय पचनी पडलेला नाही. त्यांनी पाटणामध्ये आजच 'जन अदालत' आयोजित केली आहे. जेडीयूमध्ये आपला गट प्रबळ असून तोच खरा पक्ष आहे, असा दावा यादव यांनी केला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :