ज्येष्ठ पाठ्यनिदेशकांना प्राचार्य संबोधावे : शासनाचा अफलातून प्रयोग

केवल जीवनतारे
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

40 वर्षांपासून 'जीएनएम'मध्ये प्राचार्य, उपप्राचार्यांच्या पदनिर्मितीला 'खो'
जनरल नर्सिंग अभ्यासक्रमात प्राचार्यापासून तर सर्वच शैक्षणिक पदांची निर्मिती करण्यासंदर्भात अध्यादेश काढले जातात. पुढे या अद्यादेशाची अंमलबजावणी होत नाही. चाळीस वर्षांपासून जीएनएम पाठ्यनिदेशकांच्या भरोशावर सुरू आहे. 40 वर्षांतील अतिरिक्त कामाची थकबाकी शासनाने ज्येष्ठ पाठ्यनिदेशकांना अदा करावी. अन्यथा तत्काळ पदनिर्मिती करावी.
त्रिशरण सहारे, विदर्भ वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्यसेवा कर्मचारी संघटना (इंटक), नागपूर

नागपूर : राज्यात 12 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये सुरू असलेले जनरल नर्सिंग स्कूल प्राचार्य आणि उपप्राचार्यांशिवाय सुरू आहेत. ही दोन्ही पदे राजपत्रित आहेत. ही पदनिर्मिती न करता शासनाने 'ज्येष्ठ पाठ्यनिदेशकाला प्राचार्य संबोधावे' असे पत्र पाठवले. ज्येष्ठ पाठ्यनिदेशिकेच्या हातावर प्रसादासारखा प्राचार्य पदाचा भार देऊन कामकाढू वृत्ती शासन जोपासत आहे. चाळीस वर्षांपासून सर्व नर्सिंग संस्थांमध्ये प्राचार्य, उपप्राचार्यपदांची निर्मितीच शासनाने केली नसल्याचे वास्तव उघडकीस आले.

राज्यात मुंबईत सेंट जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय, नागपुरात इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो), अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अंबेजोगाई, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, मिरज, कोल्हापूर, लातूर, धुळे येथे शासनाची जनरल नर्सिंग स्कूल सुरू आहेत. सर्व जनरल नर्सिंग स्कूलमध्ये 1200 प्रशिक्षणार्थी परिचर्या प्रशिक्षण घेत आहेत. परिचर्या स्कूल सुरू करताना शासनाने पाठ्यनिदेशक (ट्यूटर)ची नियुक्ती केली आणि जनरल नर्सिंग अभ्यासक्रम सुरू केला. तेव्हापासून ट्यूटरच्या भरोशावर अभ्यासक्रम सुरू ठेवला.

अशी असावी पदनिर्मिती
प्रत्येक दहा प्रशिक्षणार्थी परिचर्यांमागे एक पाठ्यनिर्देशक हा नियम आहे. जीएनएममध्ये रुग्णसेवेचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे यासाठी चारपेक्षा जास्त पाठ्यनिदेशक असल्यानंतर जनरल नर्सिंग स्कूलमध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पाठ्यनिदेशिक, लघुलेखक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपिक, वाहनचालक, क्‍लीनर, गृहपाल, स्वयंपाकी, शिपाई आणि चौकीदार अशी पदनिर्मिती आवश्‍यक आहे. परंतु, शासनाने राज्यातील अकरा संस्थांमध्ये वरील पदांची निर्मिती गेल्या पन्नास वर्षांत केलेली नाही. यामुळे शासनाच्या पत्रानुसार ज्येष्ठ पाठ्यनिदेशकास प्राचार्य संबोधण्यात येते.

इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगला वेगळा न्याय
नर्सिंग अभ्यासक्रमाबाबत राज्य शासनाचे धोरण फसवे आहे. राज्यात केवळ मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजमध्ये प्राचार्य, उप्राचार्य पदाची निर्मिती केली. हे कॉलेज वगळता इतर कोणत्याही नर्सिंग कॉलेजमध्ये ही पदे निर्माण केलेली नाहीत. ट्युटरच्या भरोशावर नर्सिंग अभ्यासक्रमाचा डोलारा सांभाळला जात असून, तात्पुरत्या स्वरूपात सांभाळणाऱ्या ज्येष्ठ पाठ्यनिदेशकाला मोबदलाही दिला जात नसल्याचे पुढे आले. मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगला वेगळा न्याय देण्यात येत असल्याची माहिती पुढे आली.

मेयोला 1927 पासून प्राचार्यांची प्रतीक्षा
इंग्रज राजवटीत मेयो रुग्णालयात 1927 पासून जनरल नर्सिंग अभ्यासक्रम सुरू आहे. पुढे सर्वोपचार रुग्णालय असे मेयोचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. काळानुसार मेयो बदलत गेले. परंतु, येथे असलेल्या जीएनएम अर्थात जनरल नर्सिंग अभ्यासक्रमासाठी आवश्‍यक प्राचार्यपद निर्माण करण्यात आले नाही. पाठ्यनिदेशकाच्या (ट्युटर) खांद्यावर प्रमुख पदाची धुरा दिली जाते.

'इंडियन नर्सिंग कौन्सिल'सोबत फसवेगिरी
उपचाराचा दर्जा वाढविण्यासाठी मेडिकलमधील जनरल नर्सिंग बंद केले आणि बीएससी नर्सिंग सुरू केले. परंतु, दहा वर्षांत बीएससी नर्सिंगमध्ये पदनिर्मिती झाली नाही. परंतु, त्या पूर्वीपासून राज्यातील सर्वच जनरल नर्सिंग स्कूलमध्ये ही पदनिर्मिती झाली नाही. मात्र, 'इंडियन नर्सिंग कौन्सिल' आणि 'महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल'च्या निरीक्षण दौऱ्यात कागदोपत्री प्राचार्य, उपप्राचार्य व इतरही पदे दाखविण्यात येतात. शासनाकडून इंडियन नर्सिंग कौन्सिल तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची फसवणूक गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू आहे, परंतु सारेच डोळेझाक करीत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी