#स्पर्धापरीक्षा - 'उडान योजना'

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपथी राजू यांनी दि. 21 ऑक्‍टोबर 2016 रोजी उडान (उडे देश का आम नागरिक) या योजनेची घोषणा केली. या प्रादेशिक संपर्क योजनेचा (Regional Connectivity) महाराष्ट्रातील शिर्डीसह अनेक शहरांना मोठा लाभ होणार आहे. जानेवारी 2017 पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

या योजनेमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीचा एक तासाचा विमान प्रवास 2,500 रुपयांत शक्‍य होणार असून महाराष्ट्रातील 10 शहरांना याचा फायदा होणार आहे. 

या योजनेअंतर्गत संबंधित शहरांत विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांनी 2 डिसेंबरपर्यंत इच्छित मार्गांसाठी प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. पुढच्या तीन दिवसांत त्यांची छाननी केली जाईल व नंतरच्या किमान 10 आठवड्यांत त्याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल. 

ज्या कंपनीचा प्रस्ताव पारित होईल त्या कंपनीला त्या मार्गावर तीन वर्षांसाठी विशेष (Exclusive) हक्क देण्यात येतील. त्या कंपनीला कमीतकमी 9 व जास्तीत जास्त 40 उडान जागा राखीव ठेवण्याचे बंधन असेल. 

या योजनेंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या विमानांना इंधनाच्या अबकारी शुल्कात दोन टक्‍क्‍यांची सूट मिळणार आहे. त्यामुळे तिकिटांची किंमत कमी असणार आहे. याशिवाय विमान इंधन (Aviation Turbine Fuel), विमानतळ शुल्क व तिकिटांवरील अधिभारासह इतर करांमध्येही सूट देण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे . 

हेलिकॉप्टर प्रवास देखील या योजनेत अंतर्भूत असून त्यातदेखील विविध प्रकारे सूट देण्यात येईल. 

विविध राज्य सरकारे अर्धवट स्थितीत असलेली व बंद पडलेली विमानतळे पूर्णपणे सुरू करून यामध्ये हातभार लावतील. 

या योजनेद्वारे विमान तिकिटांची संख्या सध्याच्या 8 कोटींवरून 2022 पर्यंत 30 कोटी व 2027 पर्यंत 50 कोटी करण्याचा सरकारचा मानस आहे. 

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्थेच्या (ICO) अभ्यासानुसार हवाई वाहतुकीवर केलेल्या प्रत्येक 100 रुपयांतून 325 रुपयांचे अप्रत्यक्ष फायदे तयार होतात. तसेच, या क्षेत्रात दिलेल्या प्रत्येक 100 नोकऱ्यांमागे अर्थव्यवस्थेत नवीन 610 नोकऱ्या तयार होतात. त्यामुळे, या क्षेत्राला जास्तीतजास्त चालना देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. 

'उडान' योजनेची ठळक वैशिष्टये 

  • विमानप्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याचा प्रयत्न. 
  • प्रादेशिक विमानसेवेतील 50 टक्के तिकिटे उडान सवलतीअंतर्गत; त्यासाठी सरकारकडून अनुदान. 
  • जानेवारी 2017 पासून 10 वर्षांसाठी योजनेची अंमलबजावणी. 
  • 500 किमीपर्यंतचा एक तासाचा विमानप्रवास 2500 रुपयात शक्‍य. 
  • 30 मिनिटांचा हेलिकॉप्टर प्रवासदेखील 2500 रुपयांत शक्‍य. 
  • 3 वर्षांसाठी निवडलेल्या कंपनीला त्या मार्गावर विशेष हक्क. 
  • 2022 पर्यंत देशांतर्गत विमानप्रवाशांची संख्या 30 कोटी करण्याचे उद्दिष्ट. 
  • महाराष्ट्रातील 10 शहरांना (शिर्डी, नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव) फायदा. 

 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी

#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण

#स्पर्धापरीक्षा - 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' पोर्टल