स्वच्छ जागेवरच झाडू फिरवून औरंगाबादेत केवळ 'फोटो सेशन'

माधव इतबारे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पाच मिनिटात उरकला कार्यक्रम; स्वच्छ जागेवर फिरवले झाडू 

औरंगाबाद : 'स्वच्छता हीच सेवा' असा संदेश देण्यासाठी राज्यभर राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा औरंगाबादेत पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. स्वच्छ जागेवरच झाडू फिरवून महापालिका पदाधिकारी, आयुक्तांनी अनोखा संदेश दिला असून, मोहिमेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम केवळ फोटो सेशन करून अवघ्या पाच मिनिटात उरकण्यात आला. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 'स्वच्छता हीच सेवा' असा संदेश देण्यासाठी राज्यभर मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचे उद्‌घाटन महापौर भगवान घडामोडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळा, सिडको बस स्टॅन्ड चौक येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले होते. मोहीम 15 सप्टेंबर ते दोन ऑक्‍टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. लोकसहभागातून शहराची सफाई करणे, जनजागृती करणे असा मोहिमेचा हेतू आहे. मात्र कार्यक्रमासाठी केवळ आठ ते दहा जणांची उपस्थिती होती. प्रकृतीच्या कारणामुळे महापौर भगवान घडामोडे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत.

स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या उपस्थितीत सव्वा अकरा वाजता मोहिमेचे उद्‌घाटन करण्यात आले. केवळ फोटो पुरता हा कार्यक्रम घेण्यात आला. फोटो सेशन झाल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात हा कार्यक्रम संपला. विशेष म्हणजे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ होता. या स्वच्छ जागेवरच झाडू फिरवून अनोखा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला उपायुक्त रवींद्र निकम, अयुब खान, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख भालचंद्र पैठणे यांची उपस्थिती होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :