पावसाने कल्याण-नगर मार्गावर तीन तास वाहतूक कोंडी

रविंद्र खरात
मंगळवार, 18 जुलै 2017

कल्याण-नगर महामार्गवरील शहाड पुल, बिर्ला गेट, म्हारळ सोसायटी, म्हारळ पाडा, वरप गाव आदी परिसरमधील रस्त्यात भले मोठे खड्डे पडले आहेत. मागील सलग तीन-चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने म्हारळ नाका, म्हारळ गाव प्रवेशद्वाराजवळ सकाळी अकराच्या सुमारास पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

कल्याण : कल्याण-नगर महामार्गावरील शहाड अंबिका नगर ते वरप गाव परिसरामधील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पावसाचे साठलेल्या पाण्यामुळे आज (मंगळवार) सकाळी तब्बल तीन तासाहुन अधिक काळ वाहनाची लांबलचक रांगा लागल्याने नागरिकांना, विद्यार्थी वर्गाला पाण्यामधून वाट काढत घर गाठावे लागले. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

कल्याण-नगर महामार्गवरील शहाड पुल, बिर्ला गेट, म्हारळ सोसायटी, म्हारळ पाडा, वरप गाव आदी परिसरमधील रस्त्यात भले मोठे खड्डे पडले आहेत. मागील सलग तीन-चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने म्हारळ नाका, म्हारळ गाव प्रवेशद्वाराजवळ सकाळी अकराच्या सुमारास पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात एक रिक्षा बंद पडली तर म्हारळ पाडा परिसरामध्ये रस्त्यातच लागोपाठ मालवाहु ट्रक पार्क केल्याने वाहनाची बघता बघता लांबलचक रांग झाली. ती वरप गाव ते बिर्ला गेट, शहाड पुलाच्या पलीकडे अंबिकानगरपर्यंत गेली. तब्बल तीन तासांहुन अधिक काळ वाहतुक कोंडी झाली. 

शाळा भरण्याची वेळ आणि सुटण्याची वेळ असल्याने त्याकाळात अनेक रिक्षा आणि बसमध्ये विद्यार्थी वर्ग अडकून होते तर काही पालकांनी आपल्या मुलाना त्या पावसाच्या पाण्यामधून वाट काढत घर गाठले. त्यामुळे वाहन चालकासहित नागरीक त्रस्त झाले होते. माळशेज मार्गे येणाऱ्या एसटी बसेस या कोंडीत अडकल्याने त्या मार्गावर एसटी बसेस उशिरा धावत होत्या. रस्त्यात खड्डे, पावसाचे पाणी, अरुंद रस्ते यामुळे दुपारी साडे तीन वाजले तरी कोंडी दूर करण्यात वाहतुक पोलिसांना यश आले नाही. यामुळे शहाड रेल्वे स्थानक ते वरप, कांबा गावापर्यंत वाहनांची लांबलचक रांग होतीच. दूसरीकडे कोंडी मुळे रिक्षा, बस न मिळाल्याने नागरिकांना तीन ते चार किलो मीटर पायपिट करावी लागली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :