1993 बाँबस्फोट खटला : फिरोज, ताहीर यांना फाशी; सालेम थोडक्‍यात सुटणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

अबू सालेम आणि करीमुल्ला खान यांना जन्मठेप

सालेम थोडक्‍यात सुटणार?
अबू सालेमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असली, तरी तो आजन्म तुरुंगात राहणार नाही, असे वकिलांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने पोतुर्गाल सरकारशी केलेल्या प्रत्यार्पण कायद्यामुळे सालेमला फाशी किंवा 25 वर्षांहून अधिक तुरुंगावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही. त्यातच त्याने 12 वर्षांची शिक्षा आधीच भोगली आहे. त्यामुळे अजून 13 वर्षे त्याला तुरुंगात घालवावी लागतील; मात्र केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केल्यास त्याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मुंबई - मुंबईत 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बाँबस्फोट खटल्याच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल विशेष "टाडा' न्यायालयाने आज जाहीर केला. या खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या फिरोज खान आणि ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्या यांना फाशीची, तर कुख्यात गुंड अबू सालेम आणि करीमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा ठोठाविण्यात आली. रियाज अहमद सिद्दिकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे विशेष "टाडा' न्यायाधीश जी. डी. सानप यांनी स्पष्ट केले.

या खटल्यातील दोषींना गुरुवारी शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. पोर्तुगालशी प्रत्यार्पण करार झाल्याने सालेमला कोणती शिक्षा सुनावली जाणार, याबाबत उत्सुकता होती. सालेमसह पाचही दोषींना सकाळी 11 च्या सुमारास तळोजा तुरुंगातून विशेष "टाडा' न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी शिक्षेबाबत म्हणणे मांडले.

पोर्तुगाल सरकारसोबत प्रत्यार्पण करारानुसार फाशीची शिक्षा ठोठावता येत नसल्याने सालेमला जन्मठेप द्यावी, अशी मागणी सीबीआयच्या वतीने करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली. सालेमप्रमाणेच करीमुल्लालाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची मागणी सीबीआयने केली होती. त्यानुसार त्याला जन्मठेप सुनाविण्यात आली. सालेम आणि करीमुल्ला या दोघांनाही न्यायालयाने प्रत्येकी दोन लाखांचा दंड ठोठावला.

ताहीर टकल्या आणि फिरोझ खानला कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी सीबीआयच्या वतीने केली होती. या दोघांचा स्फोट घडविण्यात जबाबदार असलेल्या मुख्य आरोपींमध्ये समावेश असल्याने त्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या मुस्तफा डोसा याचा काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’