नामकरण वाद : शिवा संघटनेने जाळला मुख्यमंत्र्यांचा पुतळा 

मनोज साखरे
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

सोलापूर विद्यापीठाला "शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर विद्यापीठ' असे नाव देण्याची शिवा संघटनेची पंधरा वर्षांपासूनची मागणी आहे.

औरंगाबाद : अखिल भारतीय वीरशैव युवक शिवा संघटनेच्या मागणीला खो देत नागपूर येथे एका कार्यक्रमात सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वक्तव्याचा निषेध करून शिवा संघटनेने सायंकाळी साडेचार वाजता खिंवसरा पार्क येथे जोडे मारून मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला. 

नागपूर येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचे वक्तव्य केले; परंतु सोलापूर विद्यापीठाला "शिवयोगी श्री सिद्धेश्‍वर विद्यापीठ' असे नाव देण्याची मागणी पंधरा वर्षांपासूनची शिवा संघटनेची होती. याबाबत अठरा सप्टेंबरला सर्व पक्षीय व सर्वधर्मीय सिद्धेश्‍वर भक्तांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता.

यापूर्वी वेळोवेळी ही मागणी सरकारकडे लावून धरली होती; परंतु समाजाशी कोणतीही चर्चा न करता, नागपुरात रविवारी अचानक विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील 85 लाख वीरशैव-लिंगायत समाज तसेच सोलापूर जिल्ह्यातील लाखो सिद्धेश्‍वर भक्तांच्या भावना पायदळी तुडवल्याची बाब व्यक्त करून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. त्यानंतर पुतळा जाळला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :