माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवसांसाठी बंद

मुरलीधर दळवी, दत्ता म्हसकर
शनिवार, 15 जुलै 2017

घाटाच्या सुरवातीला असलेल्या पर्यटन निवास स्थानाजवळ चौकात पोलिसांनी अडथळे उभारुन रस्ता बंद केला. कोणतीही माहीती नसल्यामुळे आज सकाळी या मार्गाने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना अचानक घाट बंद केल्याने त्रास सहन करावा लागत आहे. 

जुन्नर : माळशेज घाटात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवस माळशेज घाट मार्गे होणारी वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर यांनी दिली

शनिवार व रविवार कल्याण, ठाणे, मुंबई, पुणे परिसरातील हजारो पर्यटक माळशेज घाटात येतात. त्यांना घाटात जाण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारून वाहने रोखण्यास सुरुवात केली आहे. कल्याण मुरबाड माळशेज मार्गे नगर या राष्टीय महामार्गा वरील वाहतूक कर्जत खंडाळा व कसारा या मार्गाने वळविली आहे. सकाळी पोलिसांकडून प्रवासी वाहन चालक यांना रस्ता खचल्याचे कारण दिले जात होते.

माळशेज घाटात शुक्रवारी छोटे छोटे दगड पडण्यास सुरुवात झाली होती. या दगड मातीचा ढिगारा रस्त्या जवळील गटारे नाली मध्ये अडकल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. त्यात काही वाहने अडकून पडली होती. आता जेसीबी मशीनच्या सहाय्याने ही दगड माती हटविण्यात आली आहे. मात्र जोरदार पाऊस व दरडी कोसळण्याची शक्यता यामुळे घाटात येणारे पर्यटक व वाहनांना धोका पोहचून जिवीतहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन दोन दिवस पर्यटक व वाहनांना माळशेज घाटात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

टॅग्स