गोवळकोट किल्ल्यावरील तोफांचे पुनर्वसन

Gowalkot Fort
Gowalkot Fort

पुणे : जवळपास दोन शतके बोटी बांधायचे खुंट म्हणून उपयोगात असलेल्या चिपळूणजवळच्या गोवळकोट किल्ल्यावरच्या सहा ऐतिहासिक तोफांचे पुनर्वसन करण्यात पुण्यातील इतिहास संशोधक व कोकणातल्या इतिहासप्रेमींना यश मिळाले आहे. मराठे आणि ब्रिटिश सैन्यात 1818 साली झालेल्या युद्धात या तोफा वापरल्या गेल्या होत्या.

ब्रिटिश बनावटीच्या तोफांवर ज्या खुणा दिसतात, त्या खुणा या तोफांवर नसल्याने त्या तोफा मराठा लष्कराने वापरलेल्या असाव्यात, असा अंदाज आहे. 

वासिष्ठी नदीच्या किनाऱ्यावरील या किल्ल्यावर एकूण 22 तोफा असल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत सापडते. त्यापैकी गडावर फक्त पाचच तोफा शिल्लक होत्या. दहा तोफा किल्ल्याच्या खाली बंदरावर उभ्या पुरून ठेवल्या होत्या. 

गेल्या काही महिन्यांपासून बंदरावर उभ्या पुरून ठेवलेल्या तोफांचे पुनर्वसन करावे, अशी चर्चा 'सोशल मीडिया'वर सुरू होती. या चर्चेचा पाठपुरावा करत पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील संशोधक सचिन जोशी यांनी या तोफा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ग्लोबल चिपळूण, राजे प्रतिष्ठान आणि करंजेश्वरी मंदिर ट्रस्ट या स्थानिक संस्थांच्या, तसेच पुणे आणि मुंबईतील इतिहासप्रेमींच्या मदतीने सोमवारी (ता. 29) रात्री या तोफा पुन्हा किल्ल्यावर पोचल्या. 

सुरवातीच्या टप्प्यात विरोध झाल्याने काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर जोशी यांनी पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा केला. पुरातत्त्व खात्याने या तोफांची जबाबदारी कोण घेणार, याबाबत विचारणा केली असता तिन्ही स्थानिक संस्थांनी ही जबाबदारी स्वीकारायची तयारी दाखवल्याचे जोशी यांनी सांगितले. 

त्यानंतर पोलिस बंदोबस्तात तीन दिवसांच्या खोदकामानंतर मरीन बोर्डाच्या जागेत असलेल्या सहा तोफा बाहेर काढण्यात आल्या. उर्वरित चार तोफा कस्टम विभागाच्या जागेत असल्याने त्या नंतर काढण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. या तोफा नंतर ट्रॅक्‍टर-ट्रॉलीच्या साहायाने गडावर चढविण्यात आल्या. त्यासाठी स्थानिकांच्या मदतीने मातीचा रस्ता तयार करण्यात आला होता. गडावर तोफांसाठी आधीच सिमेंटचा कट्टा उभारण्यात आला होता. 

रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर तसेच कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी रविवारी किल्ल्याला भेट देऊन तोफांची पाहणी केली आणि स्थानिकांशी चर्चा केली. पावसाळा झाला की या तोफांची डागडुजी करण्यात येणार असून, त्या नव्याने किल्ल्यावर बसविण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. या तोफांपैकी सर्वांत मोठ्या तोफेची लांबी साडेसात फूट असून, सर्वांत लहान तोफ पाच फुटांची आहे. त्यांचे वजन एक ते पावणेदोन टनांच्या आसपास आहे. 

गोवळकोटचा इतिहास 
गोवळकोट किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दीने वासिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर बांधला. तीन बाजूंनी पाणी एक बाजूला खोल दरी यामुळे या किल्ल्याचे संरक्षण होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 मध्ये हा किल्ला जिंकला आणि त्याचे गोविंदगड असे नामकरण केले. पुढे हा किल्ला पुन्हा सिद्दीच्या ताब्यात गेला. सन 1733 ते 1755 दरम्यान झालेल्या लढाईत तुळाजी आंग्रे यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. अखेर 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला. त्या वेळी झालेल्या युद्धात वर उल्लेखलेल्या तोफा वापरल्याचे इतिहास संशोधक सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com