सांगवी फाट्यावर संरक्षक कठडे उभारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

वाहन चालकांच्या जीविताची काळजी घेऊन वेळीच उपाय योजना करण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे.

जुनी सांगवी : औंध येथून परिहार चौक मार्गे श्रीमंत महादजी शिंदे पुलावरून पुढे आल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची हद्द सुरू होते. पूल ओलांडल्यावर दोन्ही बाजूंना खोल नदीपात्र असून या ठिकाणचे संरक्षक खांब गेली कित्येक वर्षे गायब झाले आहेत. वाढत्या वाहनांबरोबरच अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असून, पुलालगतच्या रस्त्यांवर संरक्षक कठडे असणे आवश्यक असताना या ठिकाणच्या तुटलेल्या संरक्षक कठड्यांकडे गेली अनेक वर्षें महापालिकेच्या स्थापत्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. दोन्ही बाजूच्या दाट झाडींमुळे धोकादायक खोल नदीपात्र दिसत नाही.

आगोदरच अरुंद असलेल्या या रस्त्यावर अपघात झाल्यास वाहन सरळ दरी सदृश खोल नदीपात्रात जाऊन भीषण अपघात होऊ शकतो. पुलालगतच्या रस्त्यावर संरक्षक कठडे उभारल्यास अपघाताची तीव्रता कमी होऊ शकते. वाहन चालकांच्या जीविताची काळजी घेऊन वेळीच उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थापत्य विभागाची आहे. गेली अनेक वर्षे तुटलेल्या संरक्षक कठड्यांकडे एकाही महापालिका अधिकाऱ्याचे लक्ष गेले नाही.

या ठिकाणी त्वरित नवीन मजबूत संरक्षक लोखंडी खांब कठडे उभारावेत अशी मागणी सांगवी येथील शिवशक्ती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी ह क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. याबाबत शहर अभियंता अंबादास चव्हाण म्हणाले, लवकरच संबंधित विभागाला सुचना देऊन संरक्षक खांब बसविण्यात येतील.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :