'संस्कार ग्रुप'च्या पदाधिकाऱ्यास पोलिस कोठडी

रविंद्र जगधने
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुख्य आरोपी मात्र फरारच
कमल शेळके यांना अटक करण्यात आली असली तरी या संपुर्ण कट-कारस्थानांचा प्रमुख वैकुंठ कुंभार हा मात्र अद्यापही फरारच असल्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. 

पिंपरी - करोडो रुपयांच्या ठेवी गुंतवणूकदारांना परत न दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता.21) ठोस कारवाई सुरू केली. संस्कार ग्रुप महिला बचत गटाच्या उपाध्यक्षा कमल ज्ञानेश्‍वर शेळके यांना दिघी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. 

जानेवारीमध्ये दिघी पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायदा (एमपीआयडी) अनुसार संस्कार ग्रुपचे संस्थापक वैकुंठ प्रल्हाद कुंभार, राणी वैकुंठ कुंभार (दोघेही रा.आळंदी, ता. खेड) सुरेखा रामदास शिवले, अभिषेक कृष्णकांत घारे, राजू बाजीराव बुचडे (रा. मारुंजी, ता. मुळशी) व कमल ज्ञानेश्‍वर शेळके (रा. वडमुखवाडी, ता. हवेली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी वैकुंठ कुंभार, राणी कुंभार, कमल शेळके यांचा सत्र व उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तेव्हापासून हे तिघेही फरारी आहेत. त्यातील कमल शेळके यांना दिघी पोलिसांनी आज (ता.21) अटक केली. दरम्यान, पुणे सत्र न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची (29 सप्टेंबर पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात संस्कार ग्रुपची काही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पोलिस दप्तरी फसवणूक झालेली रक्कम साडेसहा कोटींच्यावर नोंद झाली आहे, अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली. 

आर्थिक व्यवहारांवर निर्बंध 
संस्कार ग्रुपच्या मालमत्तेवर पोलिसांनी नोंदी केल्या असून, निबंधक कार्यालयात याबाबत पत्रही देण्यात आले आहे. त्यामुळे संस्कार ग्रुपची कोणत्याही मालमत्तेचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

निमित्त झाले घटस्थापनेचे
संस्कार ग्रुपकडून गुंतवणूकदारांची झालेल्या आर्थिक फसवणुकीची रक्कम वाढत असल्याने पोलिसांना या प्रकरणातील तीनही संशयित आरोपी हवे होते. वैकुंठ कुंभार हा गुंतवणूकदारांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता, तर संस्कार ग्रुप महिला गटाची उपाध्यक्षा कमल शेळके या जानेवारीपासून पोलिसांना चकमा देत होत्या. अखेर घटस्थापनेसाठी त्या त्यांच्या वडमुखवाडीतील संस्कार सोसायटीमध्ये आल्याचा सुगावा पोलिसांना लागला. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :