आरटीई प्रवेशाची  वंचितांना पुन्हा एक संधी!

सुगत खाडे  
Tuesday, 29 September 2020

आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ एक हजार ७५६ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला. परिणामी आरटीई कोट्‍यातील ५६७ जागा रिक्त आहेत. परंतु कोरोनामुळे काही शाळा बंद असल्याने प्रवेशासाठी गेलेल्या पालकांना प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत प्रवेश मिळाला नाही.

अकोला :  आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या शेवटच्या तारखेपर्यंत केवळ एक हजार ७५६ विद्यार्थ्यांनीच निश्चित प्रवेश घेतला. परिणामी आरटीई कोट्‍यातील ५६७ जागा रिक्त आहेत. परंतु कोरोनामुळे काही शाळा बंद असल्याने प्रवेशासाठी गेलेल्या पालकांना प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत प्रवेश मिळाला नाही.

त्यामुळे अशा पालकांनी पडताळणी समितीकडे अर्ज करावे. प्राप्त अर्जाची पडताळणी समितीने तपासणी करून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सदर आदेशामुळे वंचितांना प्रवेशासाठी पुन्हा एक संधीच मिळणार असल्याचे काही शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

यावर्षी आरटीई कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील २०१ शाळांमध्ये दोन हजार ३२३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील फेब्रुवारी, मार्च महिन्यात पार पडली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (४ मार्च) जिल्ह्यातील ७ हजार ३३३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज केले होते; परंतु आरटीईअंतर्गत केवळ दोन हजार ३२३ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

परिणामी मोफत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पाच हजार १० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार नाहीत. दरम्यान यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरटीईची प्रवेश प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू होती. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु त्यानंतर सुद्धा अद्याप केवळ १ हजार ७५६ निश्चित, तर एक हजार २१० विद्यार्थ्यांचे तात्पुरते प्रवेश झाले. त्यामुळे आरटीई कोट्यातील ५६७ जागा रिक्त आहेत.

असे आहेत शासनाचे निर्देश
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सन् २०२०-२१ या वर्षाकरिता मूळ निवड यादीतील पात्र बालकांना शाळा बंद असणे, शाळेने पालकांना प्रवेशाकरिता न बोलावणे किंवा अन्य कारणामुळे पात्र बालकांचा प्रवेश झाला नसल्यास पालकांनी २७ सप्टेंबर २०२० पूर्वी पडताळणी समितीकडे जाऊन अर्ज करावा. त्यावर पडताळणी समितीने कागदपत्रांची व वस्तुस्थितीची पडताळणी करून कार्यवाही करावी.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच
कोरोनाच्या स्थितीमुळे शाळा केंव्हा सुरू होतील यासंबंधी सुद्धा अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा होत आहे. त्यामुळे यानंतर शासनाने प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्यांतर सुद्धा काही जागा रिक्तच राहण्याची शक्यता अधिक आहे. असे असले तरी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Another chance for those deprived of RTE admission!