दिवाळी शॉपींगला, कोरोना आहे ‘वेटींग’ला!

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 9 November 2020

शहरातील मुख्य बाजारपेठेतील अरुंद रस्ते आणि दिवाळी खरेदीची लगबग बघता बाजार गर्दी अनिंयत्रित होत आहे.

अकोला  ः शहरातील मुख्य बाजारपेठेतील अरुंद रस्ते आणि दिवाळी खरेदीची लगबग बघता बाजार गर्दी अनिंयत्रित होत आहे.

कोरोनासारख्या महामारीच्या संकटातही दिवाळी बाजार रस्त्यावरच भरत असल्याने गर्दी टाळून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. मात्र दिवाळी तीन दिवसांवर आली असतानाही महानगरपालिका प्रशासनाकडून दिवाळी बाजाराची स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

दरवर्षी दिवाळी बाजारासाठी अकोला शहरात स्वतंत्र व्यवस्था केली जाते. गांधी रोडवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पंचायत समिती पुढील रस्त्यावर हा बाजार भरविण्यात येतो. मात्र यावर्षी अद्याप त्याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे गांधी रोडवर खुले नाट्यगृहापुढेच किरकोळ साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे.

रस्त्यावरच हातगाड्या आणि जमिनीवर साहित्य विक्री केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांना दररोज या रस्त्यावर व्यायावसायिकांना रस्त्याच्या बाजूला बसण्याची विनंती करावी लागत आहे. वेळेत महानगरपालिका प्रशासनाकडून बाजाराबाबत निर्णय घेतल्यास मुख्य रस्‍त्यांवर होणारी व्यावसायिकांची गर्दी टाळणे शक्यत होते.

पोलिसांची डोकेदुखी वाढली
रस्त्यावर भरणाऱ्या बाजाराबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्यावर दुकाने लावणाऱ्या व्यावसायिकांना दररोज उठवण्याचे काम पोलिसांना करावे लागत आहे.

अतिक्रमण पथक व बाजार विभागाची विंनती फेटाळली
शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यावसायिकांनी न बसता पंचायत समितीपुढील रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे बाजाराची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे मनपाच्या अतिक्रमण व बाजार विभागातर्फे किरकोळ व्यावसायिकांना सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची विनंती फेटाळून व्यावसायिक मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे आता मनपा प्रशासनाकडून ठोस कारवाई करीत स्वतंत्र ठिकाणी दिवाळी बाजाराची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

वाहनतळ नसल्याने ग्राहकांची फजिती
बाजारात दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्यांची वाहणे ठेवण्यासाठी कुठेच जागा नाही. रस्त्यावर व बाजूला किरकोळ व्यावसायिकांनी त्यांची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाहने उभी करताना चांगलीच फजिती होत आहे. मुख्य रस्त्यांवर होणारी गर्दी आणि त्यातूनच वाहने जात असल्याने किरकोळ अपघात होऊन वादही वाढत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Diwali shopping raises fears of corona