महामार्गाचे चौपदरीकरण सुरू; मुख्य काम महिनाभरात

अविनाश बेलाडकर
Thursday, 10 December 2020

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे चार पैकी मधल्या टप्याचे काम सुरू झाले असून पहिल्या बडनेरा ते कुरणखेड टप्याचे किरकोळ काम सुरू झाले आहे व मुख्य कामाला प्रत्यक्षात महिनाभरात सुरूवात होणार आहे.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे चार पैकी मधल्या टप्याचे काम सुरू झाले असून पहिल्या बडनेरा ते कुरणखेड टप्याचे किरकोळ काम सुरू झाले आहे व मुख्य कामाला प्रत्यक्षात महिनाभरात सुरूवात होणार आहे.

दोन हजार ४०४ कोटी रुपयांच्या या कामाच्या निविदा मंजूर झाल्या आहेत, तीन कंपन्यांसमवेत करारही पूर्ण झाले आहेत. युपीए शासनाच्या कार्यकाळात एल अँड टी कंपनीने सोडलेले हे काम मोदी शासनाच्या कार्यकाळात इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्सीयल सर्व्हीसेस कंपनीला देण्यात आले होते.

निधी/बँक लोन उपलब्ध न होऊ शकल्यामुळे या कंपनीनेही हे काम सोडले होते. अर्धवट अवस्थेतील या कामांमुळे या महामार्गाची पार दूर्दशा होऊन अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. किमान रस्त्याची एक बाजू पूर्ण होऊ शकली असती, तरी वाहतुकीची कुचंबणा टाळता आली असती. आता मात्र नव्याने श्रीगणेशा होऊन या कामाच्या चार टप्प्यांच्या चार निविदा तीन कंपन्यांच्या मंजूर झाल्या आहेत.

पहिला टप्पा अमरावती (बडनेरा) पासून कुरणखेडपर्यंतचा आहे. दुसरा टप्पा कुरणखेड ते अकोला शहर असा आहे. या दोन्ही टप्प्यांची राजपत इन्फ्रा या कंपनीची निविदा मंजूर झाली आहे.

अकोला ते नांदुरा या तिसऱ्या टप्प्यांची निविदा मोंटे कार्लो या कंपनीची, तर नांदुरा ते चिखली (मलकापूर) या चौथ्या टप्प्याची निविदा कल्याण टोल्स या कंपनीची मंजूर झाली आहे. शासनाने या कंपन्यांच्या काम करण्याच्या तयारीला स्वीकृती दिली आहे. शासन आणि कंपन्यांदरम्यानकरारप्रक्रिया पूर्णत्वासगेली आहे.

सर्व टप्प्याचे काम करणाऱ्या कंपन्यांच्या करारावर स्वाक्षरी झाल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांवर या कामाचे कायदेशीर बंधन आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून महामार्गाचे हस्तांतरण होऊन बँक हमी प्राप्त झाल्या आहेत. महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

वर्षभरात पूर्णत्वास जाण्याची शक्यता
दोन हजार ४०४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. चारही टप्प्यांचा खर्च प्रत्येकी कमीअधिक ६०० कोटी रुपयांचा असेल. वर्षभरात काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

तीन टोल नाके
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातच टोल नाक्यांच्या इमारत उभारणीचा समावेश आहे. अमरावती पासून चिखली (मलकापूर) पर्यंतच्या सुमारे २५० किलोमीटर अंतरात कुरणखेड, तरोडा कस्बा आणि दसरखेड अशा तीन ठिकाणी टोल नाके असतील.

मूर्तिजापुरात आरओबी
मूर्तिजापुरात कारंजा रस्त्यावरील राजे संभाजी चौकापासून आकोला व अमरावतीच्या दिशेने दोन्हीकडे ४०० मीटर आंतरापर्यंत रेल्वे ओव्हरब्रीज असेल. दोन्ही बाजूला सर्विस रोड असेल.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अमरावती ते चिखली दरम्यानच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी तीन कंपन्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्यासमवेत करार पूर्ण झाला. किरकोळ कामांना सुरूवात झाली आहे. मशीनरी येऊन पोचल्या आहेत. प्रत्यक्ष काम महिनाभरात सुरू होईल. मेंटेनन्सची जबाबदारी या कंपन्यांची असेल.
- पी. डी. ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण.

महामार्गाचे काम लांबल्यामुळे आपघातांचे प्रमाण वाढले आहे. अरूंद व खड्ड्यानी भरलेले शकुंतला रेल्वे फाटक अपघातांना निमंत्रण देते. त्याठिकाणी डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.
-द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष मूर्तिजापूर

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Four-laning of highway begins; Main work throughout the month