शहराचे रूप पालटले; स्वच्छ, सुंदर रस्ते वेधतायेत लक्ष

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 30 October 2020

अधिकारी व पदाधिकारी यांचा योग्य सुसंवाद असला की कोणतेही अश्यक्य काम शक्य होत असते. याचा प्रत्यय लोणार शहरवासी घेत आहे. एकीकडे शहरातील साफसफाई व स्वच्छतेबाबत लोणार नगर परिषद आरोग्य विभाग हा पिछाडीवर होता; मात्र अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे लोणार शहराचे रूपडे पालटल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

लोणार (जि.बुलडाणा) : अधिकारी व पदाधिकारी यांचा योग्य सुसंवाद असला की कोणतेही अश्यक्य काम शक्य होत असते. याचा प्रत्यय लोणार शहरवासी घेत आहे. एकीकडे शहरातील साफसफाई व स्वच्छतेबाबत लोणार नगर परिषद आरोग्य विभाग हा पिछाडीवर होता; मात्र अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे लोणार शहराचे रूपडे पालटल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

लोणार नगर परिषद आरोग्य विभागाचा कारभार आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांनी ता. १ सप्टेंबर २०२० रोजी स्वीकारला. त्यांनी आरोग्य विभागाची दयनीय अवस्था पाहून शहर स्वच्छते अगोदर नगर परिषद आरोग्य विभाग स्वच्छ व सुंदर करत ‘आधी केले मग सांगितले’ या म्हणी प्रमाणे सर्वांना सहकार्य करीत लोणार शहर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहराला नावलौकिक मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्याचे तसेच काही मार्गदर्शक सूचना करण्याचे सांगितले.

त्याचाच परिपाक म्हणून सध्या शहरात सर्वत्र स्वच्छतेचे वातावरण दिसू लागले आहे. शहर स्वच्छतेसाठी नगर परिषदेच्या सात घंटा गाड्या या घरोघरी जावून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करीत आहे. त्याच बरोबर दुकाने-प्रतिष्ठाने या करिता दुपारी ते सायंकाळी २ घंटा गाड्या कार्यरत आहेत.

नालीमधील साफसफाईसाठी एक ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहरातील नाल्यामध्ये बीएसी पावडर तसेच मलेरीया ऑइलची दोन वेळा फवारणी करण्यात येऊन शहर डासमुक्त करण्यात आले. स्वच्छतेसाठी सोशल मीडियाचा वापर करत व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करण्यात आले. कुणाची स्वच्छता विषयी काही तक्रार असल्यास व्हॉट्स ॲप ग्रुपवर टाकण्याबाबत सूचना देऊन आलेल्या तक्रारींचे तत्काळ स्वच्छता करून निपटारा केल्या जात आहे.

आता येणाऱ्या काळात आठवडी बाजार व मापारी वेटाळ येथील शौचालय नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असून, या लोणार शहर स्वच्छतेसाठी आरोग्य निरीक्षक अशोक निचंग यांच्या सोबत त्यांचे सहकारी शे. सलीम, चेतन बाजड, शुभम मोरे, शे.अनामत शे. करामत, शे. तौफिक शे. अजीज, शे. वाजेद शे. महेबुब, कैलास मादनकर, मंगेश मापारी, संतोष डोळे, गोपाल डागर, विजय नरवाडे, सुनील इरतकर, संतोष डागर, तेजराव पाटोळे, गणेश लांडगे, नितीश घाटोळे, विनोद बाजड, नरेंद्र खरारे, हे स्वच्छतादूत अथक मेहनत घेत आहेत.

सर्वांच्या सहकार्याने शहराचा चेहरा मोहरा बदलला असून, घाणीचे लोणार आता स्वच्छ , सुंदर लोणार दिसत असून शहराचे रूपडे पलटल्याचे चित्र आहे. लोणार शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी शहरातील नागरिकांचे मौलाचे सहकार्य मोठ्या प्रमाणात आहे.

नागरिक करताहेत मोलाचे सहकार्य
जगप्रसिद्ध लोणार शहराची ओळख लोणार सरोवर यामुळे होत आहे. येथील नागरिक शहर स्वच्छतेसाठी सहकार्य करीत आहेत. नगरपालिकेने देशातून स्वच्छतेबाबत स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात आपली आणखी ओळख व्हावी म्हणून नगरपालिकेचे अध्यक्ष पूनम पाटोळे, उपाध्यक्ष बादशहा शेठ, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते प्राध्यापक बळीराम मापारी, सर्व नगरसेवक आपल्या वॉर्डातून सर्व प्रकारच्या कचरा काढण्यासाठी नागरिकांना आवाहन करतात. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात लोणार शहराची ओळख स्वच्छ शहर सुंदर शहर लोणार सरोवराचे शहर अशी झाल्याशिवाय राहणार नाही.
- विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी, नगर परिषद, लोणार

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Lonar Municipal Council leads in clean survey